आपल्या देशाचे दुर्दैव म्हणजे इस्रायलसारख्या आपल्याही सीमा शत्रूंनी वेढलेल्या आहेत. शिवाय काही नेत्यांच्या बेधुंद स्वप्नवादामुळे आपण आंतरराष्ट्रीय संबंधात नेहमी फसत आलो आहोत. एकेकाळी ‘हिंदी-चिनी भाई भाई’ ही घोषणा जोरात होती. आपण त्या मैत्रीच्या धुंदीत असतानाच चीनने आपल्यावर आक्रमण केले! त्यावेळी भारतीय सैन्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शत्रूशी जोरदार लढा दिला, हिमालयाच्या बर्फात आपल्या रक्ताच्या नद्या वाहवून देशाच्या सीमांचे रक्षण केले होते. त्यावर १९६४ साली आलेल्या सिनेमाचे नाव होते ‘हकीकत’.
चेतन आनंद यांनी लष्कराच्या सहकार्याने लडाखमध्ये चित्रण केलेल्या सिनेमात धर्मेंद्र, बलराज सहानी, प्रिया राजवंश (पदार्पण), सुधीर, संजय खान आणि विजय आनंद यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘हकीकत’ ही लडाखमधील मेजर शैतानसिंग यांच्या नेतृत्वाखाली तुकडीने ‘रेझांग ला’ भागात चिनी सैन्याशी दिलेल्या लढ्याची वीर आणि करुणरसाने भरलेली सत्यकथा होती.
कैफी आझमी यांचे एकेक गाणे म्हणजे मदन मोहन यांच्या संगीताच्या बावनकशी सोन्यात मढवलेला हिराच! वर रफीसाहेबांचा नितळ आवाज म्हणजे अख्खे प्रेक्षागार ढसाढसा रडू लागायचे! आपले सर्वस्व पणाला लावलेल्या जवानांची मृत्यूच्या अगदी शेवटच्या क्षणी असणारी मन:स्थिती सांगणारे एक गाणे कैफीसाहेबांनी लिहिले होते. ते ऐकताना अजूनही डोळ्यांत पाणी येते.
कर चले हम फिदा, जानो-तन साथियों,
अब तुम्हारे हवाले वतन साथियों…
मरतानाही जवानांना काळजी फक्त देशाची! प्रत्येक शब्द त्या वीरांच्या मृत्यूचे चित्र डोळ्यांसमोर उभे करून मनाला व्यथित करायचा. त्या तुकडीत १२० सैनिक होते. ‘पहिली गोळी आपण चालवायची नाही,’ असे आपले नेहमीचे सोवळे आदेश असल्यामुळे सशस्त्र चिनी सैनिक आपल्याला घेरत आहेत, हे दिसत असूनही त्यांना सुरुवातीला काहीही करता आले नाही. वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करताना त्या जिगरबाज सैनिकांपैकी ११४ शहीद झाले होते! त्यांच्या मृत्यूसमयाचे मोठे करुण वर्णन कैफी आझमीसाहेबांनी या गाण्यात केले –
सांस थमती गई, नब्ज़ जमती गई,
फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया,
कट गये सर हमारे तो कुछ गम नहीं,
सर हिमालय का हमने न झुकने दिया
मरते मरते रहा बांकपन साथियों,
अब तुम्हारे हवाले वतन साथियों…
‘आमची कितीही शिरे धडावेगळी झाली तरी हरकत नाही, आम्ही आपल्या हिमालयाचे शिखर मात्र सुरक्षित ठेवले’ ही ओळ येते तेव्हा प्रत्येक भारतीयाला हुंदका अनावर होत असे. कैफी आझमींच्या लेखणीतून लाव्हा रसासारख्या उतरलेल्या पुढच्या ओळी तर केवळ अजरामर आहेत! कुणाही देशभक्ताला समाजासाठी, देशासाठी काहीतरी उदात्त करायला त्या प्रेरणा देऊ शकतात!
ज़िंदा रहने के मौसम बहुत है मगर,
जान देनेकी ऋत रोज़ आती नहीं
हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे,
वो जवानी जो खुं में नहाती नहीं.
आज धरती बनी हैं दुल्हन साथियों…
कैफी आझमी यांनी जगण्यापेक्षा शहीद व्हायला जास्त उत्सुक असणाऱ्या जिगरबाज सैनिकाच्या कलंदर मानसिकतेची जणू व्याख्याच करून टाकली होती! खरे तर, बिचाऱ्या जवानांना वर्षातून एखादा महिनाच सुट्टी मिळते. आपल्या प्रियजनांबरोबर तेवढेच क्षण ते जगून घेतात. बाकी वर्षभर तर मृत्यूला समोर ठेवूनच जगायचे असते. बाप रे! कसला हा कैफ! कसली ही दैवी निष्ठा! केवढी समर्पणाची पवित्र भावना!
जितक्या वेळा हे गाणे ऐकावे तितक्या वेळा या ओळींनी अंगावर काटा आणल्याशिवाय राहात नाही! त्यावेळी या शहिदांच्या त्यागाचा सगळ्या देशावर इतका प्रभाव पडला होता की, इप्टाच्या बलराज सहानी, चेतन आनंद, कैफी आझमी आणि शबाना आझमी यांच्या मातोश्री असलेल्या अभिनेत्री शौकत आझमी यांनी आपल्या कामाचा मोबदलासुद्धा घेतला नाही!
या वीरांच्या इतर सहकाऱ्यांना जाता-जाता दिलेला संदेशही किती प्रेरणादायी आहे –
राह कुर्बानियों की न वीरान हो,
तुम सजातेही रहना नए क़ाफ़िले,
फतह का जश्न इस जश्न के बाद हैं,
ज़िन्दगी मौत से मिल रही हैं गले!
बांध लो अपने सरसे कफ़न साथियों
अब तुम्हारे हवाले…
जुन्या काळाचे कवी देशाच्या संस्कृतीशी, भावविश्वाशी किती समरस होते त्याचा पुरावा म्हणून या गाण्याकडे पाहता येते. कैफी आझमी हा जन्माने मुस्लीम आणि विचारांनी कम्युनिस्ट असलेला कवीही भारतीय भावविश्वातील नेमकी प्रतीके किती सहजपणे वापरतो ते पाहण्यासारखे आहे –
खींच दो अपने खुं से ज़मीं पर लकीर,
इस तरफ आने पाए न रावण कोई,
तोड़ दो हाथ अगर हाथ उठने लगे,
छूने पाये न सीताका दामन कोई
राम भी तुम, तुम्हीं लक्ष्मण साथियों,
अब तुम्हारे हवाले वतन साथियों…
गाण्यातली ‘राम भी तुम, तुमही लक्ष्मण साथियों’ ही ओळ जेव्हा येते तेव्हा बॉलिवूडच्या, अर्थात जुन्या काळातील, गंगाजमनी तहजीबचा, समंजस सहजीवनाचा, सुखद नॉस्टॅल्जिया जागा होतोच.
परवा पुन्हा आपल्या गाफीलपणामुळे आपण तिन्ही सेनांचे प्रमुख असलेल्या जनरल स्व. बिपीन रावत यांना आणि त्यांच्या अनेक जांबाज सहकाऱ्यांना गमावले! कदाचित जाताना ते सर्व वीरही हेच म्हणत स्वर्गात गेले असतील! “अब तुम्हारे हवाले वतन साथियों!” पण धार्मिक तेढ, जातीयवाद आणि लोभी राजकारण्यांनी सर्वच क्षेत्रात पसरवलेला बेशरम भ्रष्टाचार यांनी आतून पोखरलेला आपला ‘वतन’ यापुढे कधीतरी सुरक्षित असणार आहे का?
देवच जाणे!