काळजी करायची, तर नामाची करा

  74

 ब्रह्मचैतन्य श्री गाेंदवलेकर महाराज


आपण असे पाहतो की, आज जे दुःखाचे वाटते तेच पुढे सुखाचे होते आणि जे सुखाचे आहे, असे वाटते तेच पुढे दुःखाला कारणीभूत होते. तुम्हाला जे सुखदुःख येते ते भगवंतापासून येते म्हटले, तर दुःखाचे कारण काय? जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंतानेच दिले असे वाटत नाही, तोपर्यंत आपण भगवंताचे झालो नाही. आपण घाबरतो केव्हा, तर आपला आधार सुटला म्हणजे, जे जे होते ते रामाच्या इच्छेने होते, असे समजावे. संकटे देवाने आणली, तर ती सोसण्याची शक्तीही तोच देतो. समर्थांचे होऊन असे भ्यावे का? समर्थांचे जे झाले त्यांनी परिस्थितीला नाही डगमगू. प्रत्यक्ष संकटाचे निवारण जर करता येते, तर मग भीती कशाची धरावी? मुळात जी भीती नाही ती तुम्ही मनाने निर्माण करता याला काय म्हणावे? खेळातली सोंगटी मेली म्हणजे त्याचे सुख-दुःख कोणी करतो का? तसे व्यवहारात आपण वागावे. सुखाने हुरळून जाऊ नये आणि दुःखाने अस्वस्थ होऊ नये. असे व्हायला आपले मन शांत राहणे जरूर असते. जोपर्यंत ‘मी कर्ता आहे’ अशी भावना असते, तोपर्यंत सुखदुःखाचे हेलकावे मनाला बसतात. म्हणून कर्तेपण रामाकडे द्यावे आणि देहाने कर्तव्यात राहून मन शांत ठेवावे. ‘परिस्थितीचा परिणाम माझ्या मनावर घडू देऊ नको देवा’ असे म्हणावे, ‘परिस्थितीच बदल’ असे देवाला म्हणू नये.



ज्याप्रमाणे एखादे विष रक्तात मिसळावे, त्याप्रमाणे काळजी आपल्या अंगात भिनली आहे. त्याला वरून औषध लावले, तर उपयोग होत नाही. यासाठी भगवंताच्या अनुसंधानाचे इंजेक्शनच पाहिजे. जे दुर्गुण भगवंताचा विसर पाडायला कारण होतात, त्या सर्वांचा संग्रह म्हणजे काळजी होय. काळजी हा फार मोठा रोग आहे. पोटात रोग वाढला आणि त्यानेच पोट भरले की, रोग्याला अन्न जात नाही. त्याचप्रमाणे, ज्याला काळजी फार, त्याच्या हृदयात आनंद जाऊच शकत नाही. या काळजीचे आई-बाप तरी कोण? देहबुद्धीमुळे आपल्याला काळजी लागते. देहबुद्धी म्हणजे वासना. वासना आणि अहंकार हे काळजीचे आई-बाप आहेत. अशा और स्वभावाचे आई-बाप असल्यावर पोर असे विचित्र असायचेच! भगवंताचे स्मरण करीत गेल्याने आईचा आणि मुलीचा मृत्यू बरोबर घडून येतो; वासना आणि काळजी दोघीजणी एकदम मरतात. खरे म्हणजे, एकच स्थिती कधी कायम राहात नाही म्हणून आपल्याला भीती वाटते आणि तिच्यातून काळजी उत्पन्न होते. काळजी जितकी आपल्याला मारते, तितकेच नाम आपल्याला तारते. आपला जेवढा वेळ काळजीत गेला, तेवढा वाया गेला असे समजावे. काळजी करायचीच असेल, तर अनुसंधान कसे टिकेल याची करा.

Comments
Add Comment

देवर्षी नारद

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी विणेच्या मंजुळ तालावर “नारायण... नारायण” असा नाम जप करीत त्रैलोक्यात अनिरुद्ध

जाणिले ज्याने आयुष्याचे मर्म

मनाचा गाभारा : अर्चना सरोदेया क्षणभंगुर आयुष्य म्हणजे, जणू अळवावरचे पाणी!! क्षणांत भासे

देवाकरिता स्वतःला विसरावे

अध्यात्म ब्रह्मचैतन्य : श्री गोंदवलेकर महाराज तुम्ही स्वत:ला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही? हल्ली आपण

सद्गुरू का हवे?

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै आज अध्यात्माच्या विरोधात काही विशिष्ट प्रवृत्ती निर्माण झालेल्या आहेत. देव

प्रयत्नांच्या सावल्यांत हरवत गेलेले रंग

ऋतुराज : ऋतुजा केळकर “काष्ठादग्निर्जायते मथ्यमानाद्भूमिस्तोयं खन्यमाना ददाति। सोत्साहानां नास्त्यसाध्यं

सोमवारी सोमप्रदोष शिवरात्री,पितृदोषातून मुक्त होण्यासाठी करा हे उपाय

सोमवार २७ जानेवारी २०२५ रोजी पौषातील सोमप्रदोष शिवरात्री आहे. या दिवशी मनापासून निवडक उपाय केल्यास पितृदोषातून