
अॅडलेड (वृत्तसंस्था):वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसह (४ विकेट) ऑफस्पिनर नॅथन लियॉन (३ विकेट) आणि मध्यमगती गोलंदाज कॅमेरॉन ग्रीनच्या (२ विकेट) अचूक माऱ्यासमोर इंग्लंडला पहिल्या डावात २३६ धावांवर रोखताना ऑस्ट्रेलियाने अॅशेस क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या डावात २३७ धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसअखेर, शनिवारी १ बाद ४५ धावा करताना यजमानांनी एकूण आघाडी २८२ धावांवर नेली.
२ बाद १७ धावांवरून पुढे खेळताना तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील अनुक्रमे डॅविड मॅलन (८० धावा) आणि कर्णधार ज्यो रूटने (६२ धावा) दुसऱ्या विकेटसाठी १४८ धावांची मोठी भागीदारी करताना इंग्लंडला सुस्थितीत आणले. मात्र, दोघेही सात धावांच्या फरकाने माघारी परतल्यानंतर पाहुण्यांचा डाव कोसळला. १९ धावांमध्ये ३ विकेट पडल्या. ऑली पोप (५ धावा), जोस बटलर (०) झटपट बाद झाल्याने ३ बाद १५० वरून ६ बाद १६९ धावा अशी त्यांची अवस्था झाली. मधल्या फळीतील बेन स्टोक्स (३४ धावा) आणि ख्रिस वोक्समुळे (२४ धावा) इंग्लंडला दोनशेपार मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (३७-४) सर्वात यशस्वी ठरला. त्याला फिरकीपटू नॅथन लियॉन (५८-३) आणि मध्यमगती कॅमेरॉन ग्रीनची (२४-२) चांगली साथ लाभली. यजमान गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी आठ विकेट घेत संघाला मोठी आघाडी मिळवून दिले. तसेच ऑस्ट्रेलियाचे वर्चस्वही कायम राखले.
दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नर (१३) आणि मार्कस हॅरिस (खेळत आहे २१) या बिनीच्या जोडीने सावध सुरुवात करताना ४१ धावांची सलामी दिली. मात्र, वॉर्नर दुर्देवीरित्या धावचीत झाल्याने सलामी फुटली. मात्र, हॅरिसने नाईट वॉचमन मायकेल नेसेरसह (खेळत आहे २) उर्वरित ४ षटके खेळून काढली. तिसऱ्या दिवसअखेर १ बाद ४५ धावा करताना यजमानांनी एकूण आघाडी २८२ धावांवर नेली.