Saturday, October 25, 2025
Happy Diwali

मराठवाड्यातील ४ लाख शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग झाला मोकळा

मराठवाड्यातील ४ लाख शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग झाला मोकळा

हिंगोली : राज्यासह मराठवाड्यात अतिवृष्टीने सर्वच जिल्ह्यांना झोडपून काढले होते. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी सर्व स्तरातून मागणी केली जात होती. प्रत्येक महसूल मंडळात गावागावात जाऊन शेतातील दहा बाय दहा मधील सोयाबीन कापणी करून त्याचे आनेवारी काढण्यासाठी डेटा वर पाठवला होता. शिवाय विविध जिल्ह्यांची १५ डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर झाली. यात बहुतांशी जिल्ह्याची पैसेवारी ५० पैसेच्या आत असल्याने शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता पिकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना ही पीक विमा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात पासूनच अतिवृष्टीने फटका बसायला सुरुवात झाली होती. सोयाबीनच्या फुलोरा अवस्थेपासून ते काढणीपर्यंत अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, सोबतच इतरही पिकांना याचा फटका बसला. अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणीत सापडले होते. अनेक ठिकाणी प्रशासनाने काढलेली पैसेवारी ५० पेक्षा अधिक असल्यामुळे पिकवीमा मिळणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर जिल्ह्यातील सुमारे ४ लाख शेतकऱ्यांचे लक्ष अंतिम पैसेवारीकडे लागले होते. पण सर्व ठिकाणी पैसेवारी ५० पैशाच्या आत आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील खरीप अंतिम पैसेवारी महसूल प्रशासनाने जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील ७०७ गावांची पैसेवारी ४५.९९ पैसे आली आहे. जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात ३.९४ लाख हेक्कटर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. यामध्ये सर्वात जास्त २.५० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचां पेरा होता. त्यापाठोपाठ पन्नास हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड तसेच उर्वरित क्षेत्रावर तूर, उडीद,मूग, ज्वारी पिकांची पेरणी झाली होती. मात्र यामध्ये पिकं हाती येण्याच्या वेळेस अतिवृष्टी झाल्याने मोठे नुकसान झाले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा