
नवी दिल्ली : कोरोनाचा नवीन वेरियंट ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याने देशातील रुग्णांची संख्या ही ९७ वर पोहोचली आहे. देशात गुरुवारी १४ आणि शुक्रवारी सकाळी १० नवीन रुग्ण आढळून आले. दक्षिण आफ्रिकेत हा वेरियंट आढळून आल्यानंतर एक महिन्याहून कमी कालावधीत ८० देशांमध्ये तो पसरला आहे. भारतातही ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आता दिल्लीत गेल्या २४ तासांत ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याचे समोर आले आहे. दिल्लीत ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या २० वर पोहोचली आहे. दिलासा देणारीबाबत म्हणजे यापैकी १० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दुसरीकडे, देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे.
दिल्लीत शुक्रवारी सकाळी ओमायक्रॉनचे १० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही २० वर गेली आहे. २० पैकी १० जणांना डिस्चार्ज दिला आहे, अशी माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली.
आतापर्यंत महाराष्ट्रात ३२, राजस्थान १७, दिल्ली २०, गुजरात ६, केरळ ४, कर्नाटक ८, तेलंगण ६, आंध्र प्रदेश, चंदीगड, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत प्रत्येक एक रुग्ण आढळून आला. यापैकी अनेक रुग्ण बरेही झाले आहेत.