Tuesday, May 6, 2025

देशक्रीडामहत्वाची बातमी

गतविजेत्या सिंधूचे आव्हान संपुष्टात

गतविजेत्या सिंधूचे आव्हान संपुष्टात

हुएल्वा (वृत्तसंस्था): भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील जेतेपद राखण्यात अपयश आले. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत शुक्रवारी अव्वल मानांकित चायनीज तैपेईच्या टाइ त्झु यिंगकडून १७-२१, १३-२१ अशा फरकाने पराभूत व्हावे लागले.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या टाइ त्झु यिंगने दोन्ही गेममध्ये जबरदस्त खेळ करत गतविजेतीला पुनरागमनाची संधी दिली नाही. त्यामुळे सिंधूला ४२ मिनिटांत हार मानावी लागली. उपउपांत्यपूर्व फेरीत दहाव्या मानांकित थायलंडची प्रतिस्पर्धी पोर्नपॅवी चोचुवाँगवरील एकतर्फी लढतीनंतर सिंधूकडून अपेक्षा वाढल्या. मात्र, नॉकआउट फेरीतील तिचे अपयश कायम राहिले. दुसरीकडे, टाइ त्झु यिंगने स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरचा २१-१०, १९-२१, २१-११ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. तिने सिंधूविरुद्ध सातत्य राखले. टोक्यो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत टाइ त्झु यिंग हिने सिंधूला धूळ चारली होती.

पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉयने सलग दुसऱ्या विजयासह पुरुष एकेरीत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत ३२व्या स्थानी असलेल्या प्रणॉयने दुसऱ्या फेरीत मलेशियाच्या डॅरेन लिवला २१-७, २१-१७ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. पुरुष एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठणारा प्रणॉय हा किदंबी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांच्यानंतर भारताचा तिसरा बॅडमिंटनपटू आहे.

महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांनीही आगेकूच केली. भारताच्या जोडीने १४व्या मानांकित लिओ श्वान श्वान आणि शा यु टिंग या चिनी जोडीवर २१-११, ९-२१, २१-१३ अशी मात केली.

Comments
Add Comment