Friday, October 31, 2025
Happy Diwali

प्राचीन कृषी शास्त्र पुन्हा शिकण्याची गरज: पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्राचीन कृषी शास्त्र पुन्हा शिकण्याची गरज: पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्याला आपले प्राचीन कृषी शास्त्र पुन्हा शिकण्याची गरज आहे, एवढेच नाही, तर त्यावर नव्याने संशोधन करून, ते अद्ययावत करून हे प्राचीन ज्ञान, आधुनिक विज्ञानाच्या साच्यात बसवायचे आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

नैसर्गिक शेतीविषयक राष्ट्रीय परिषदेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, गुजरातचे राज्यपाल, तसेच उत्तर प्रदेश आणि गुजरातचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

दरम्यान, या दिशेने आपल्याला नव्याने संशोधन करावे लागेल, आपल्या प्राचीन ज्ञानाला नव्या स्वरूपात आणावे लागेल, असेही मोदी यावेळी म्हणाले. आपल्याला पारंपरिक पद्धतीने जे शहाणपण मिळाले आहे, त्याविषयी दक्ष राहावे, असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आता देशाच्या स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीपर्यंतचा २५ वर्षांचा प्रवास, नवी आव्हाने आणि नव्या गरजांच्या अनुकूल शेतीव्यवस्थेत बदल करणारा असावा, असे आवाहन शेतकऱ्यांना केले. गेल्या सहा-सात वर्षांत, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली असे सांगत, पंतप्रधानांनी बियाणापासून ते मालाचे विपणन करण्यापर्यंतच्या योजनांचा उल्लेख केला. तसेच किसान सन्मान निधीपासून, ते किमान हमी भाव, उत्पादनाच्या दुप्पट निश्चित करण्यापर्यंत त्यांनी भर दिला.

सिंचनाची भक्कम व्यवस्था उभरण्यापासून, ते सर्व दिशांना किसान रेल्वेचे जाळे उभारण्यापर्यंत, अशा सर्व कृषिविषयक सुधारणांचा त्यांनी उल्लेख करत या कार्यक्रमात देशातील सहभागी शेतकऱ्यांचे पंतप्रधान मोदी यांनी अभिनंदन केले.

देशाच्या हरित क्रांतीत रसायने आणि कृत्रिम खतांचा मोठा वाटा होता, यांची दखल घेत पंतप्रधान म्हणाले की, आता आपल्याला या पर्यायी शेतीवरही काम करण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी रासायनिक कीटकनाशकांचे दुष्परिणामही सांगितले.

पिकांचे उरलेले अवशेष शेतात जाळून टाकण्याच्या पद्धतीविषयी बोलताना, शेतात अशी आग लावल्याने, भूमीची सुपीकता नष्ट होते, असे कृषितज्ज्ञांनी वारंवार सांगितले आहे, तरीही या घटना होत राहतात, अशी खंत यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment