सिंधुदुर्ग (हिं.स.) : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणा-या महाविकास आघाडी सरकारला जाग आणण्यासाठी आज सावंतवाडीतील एसटी कर्मचारी, नागरीक, विद्यार्थी व प्रवाशांनी मोर्चा काढला. यावेळी एसटी कर्मचा-यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहीजेत, त्याच बरोबर तात्काळ एसटी बस सुरू करण्यात यावी, अशा विविध घोषणा देण्यात आल्या. याबाबतचे निवेदन तहसिलदारांना पदाधिका-यांकडून देण्यात आले. दरम्यान सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शविला.
सावंतवाडी बसस्थानकापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यात ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि प्रवासी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या मोर्चा दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ग्रामीण भागातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तात्काळ बसफेऱ्या चालू करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. तर सीमेवर ज्याप्रमाणे सैनिक डोळ्यात तेल घालून संपूर्ण भारतीय जनतेचे रक्षण करतात, त्याचप्रमाणे एसटी कर्मचारी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी रात्रंदिवस मेहनत घेऊन प्रामाणिक काम करीत आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचारी, अधिकारी व आमदार, मंत्री यांनी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.