
नवी दिल्ली : मिस वर्ल्ड स्पर्धेत (Miss World 2021 ) भारताचे प्रतिनिधीत्व करणारी मानसा वाराणसी (Manasa Varanasi) कोरोनाच्या (Corona) विळख्यात अडकली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे.
जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. जगात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा परिणाम मिस वर्ल्ड २०२१ या स्पर्धेवरही पडला आहे.
मिस वर्ल्ड २०२१ ही स्पर्धा कोव्हिडमुळे आधीच लांबणीवर पडली होती. त्यानंतर १६ डिसेंबर २०२१ रोजी या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र सौंदर्यवती मानसा वाराणसी हिला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हा सोहळा रद्द करण्यात आला आहे.
हरनाज सिंधू हिने मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकल्यानंतर आता सर्वांच्याच नजरा मिस वर्ल्ड या स्पर्धेकडे लागल्या होत्या. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व सौंदर्यवती मानसा वाराणसी करत आहे. मात्र नुकतेच तिला कोरोनाची लागण झाल्याने हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. मिस इंडिया ऑर्गनायझेशनने याबाबतची माहिती दिली.
तर दुसरीकडे मिस वर्ल्डने इन्स्टाग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, मिस वर्ल्ड २०२१ च्या स्पर्धक, कर्मचारी, क्रू आणि सामान्य लोकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोर्तो रिकोमधील अंतिम फेरी तात्पुरती पुढे ढकलण्यात येत आहे. ही अंतिम फेरी पुढील ९० दिवसांत पोर्तो रिको कोलिझियम जोस मिगुएल ऍग्रेलॉट येथे आयोजित करण्यात येणार आहे.
मानसा वाराणसी ही २०२० फेमिना मिस इंडिया विजेती आहे. हैदराबादमध्ये जन्मलेली मानसा आर्थिक माहिती विनिमय विश्लेषक (फायनान्शियल इन्फॉर्मेशन एक्स्चेंज अॅनालिस्ट) आहे. अर्थविषयक माहिती जाणून घेणं तिला आवडतं. मानसा वाराणसी ही २३ वर्षांची आहे. तिने ‘मिस तेलंगणा’ हा खिताब जिंकला आहे. वास्वी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून मानसाने तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिला संगीत, योगा, निसर्गाची आवड आहे. ‘मिस इंडिया’ चा मान पटकावणारी ती तेलंगणामधील पहिली मुलगी ठरली आहे. सध्या मानसा ही मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे.