नवी मुंबई : नर्सिंग क्षेत्रात कुशल असणाऱ्या व परदेशात विशेषत: जपान सारख्या आधुनिक व तांत्रिकदृष्टया प्रगत देशात जावून काम करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी दि. 22 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 1.30 या कालाविधीत निर्दिष्ट कुशल कामगार कार्यक्रम SSW (Specified Skilled Workers Programme) कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानचे पंतप्रधान सुगा योशीहिदे यांच्या दि. २३ सप्टेंबर २०२१ रोजी वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या बैठकीत उत्पादन, एमएसएमई आणि कौशल्य विकासामध्ये द्विपक्षीय भागीदारी विकसित करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली होती. याबाबत भारत व जपानमध्ये निर्दिष्ट कुशल कामगार कार्यक्रम SSW (Specified Skilled Workers Programme) बाबत करार करण्यात आला आहे.
जपान येथे नोकरी करण्यास इच्छुक भारतातील युवक/युवतींकरिता जपानतर्फे कौशल्य आणि भाषा चाचणी घेण्यात येणार आहे. या अनुषंगाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम जपान मधील विविध क्षेत्रातील नोकरीच्या विविध संधीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात येत असून, या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील जपानी कंपन्या सहभागी होणार आहेत. यामध्ये नर्सिंग, ईमारत साफसफाई व्यवस्थापन, कच्चा माल उद्योग, मशिनरी निर्माण उद्योग, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक सूचना संबंधित उद्योग, बांधकाम उद्योग, जहाज निर्माण आणि समुद्री उद्योग, वाहन दुरुस्ती व देखभाल उद्योग, विमान उड्डाण उद्योग, आवास उद्योग, कृषी उद्योग, मत्स्यपालन, खाद्य आणि पेय निर्माण उद्योग, भोजनालय व्यवसाय या क्षेत्रातील उद्योगांचा समावेश असणार आहे. या क्षेत्रांपैकी “ नर्सिंग क्षेत्रातील ” जपानमध्ये उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधीची माहिती देण्यासाठी दि.२२ डिसेंबर २०२१ रोजी SSW कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये विविध कंपन्यांव्दारे त्यांच्या कंपनीची माहिती देण्यात येईल. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या युवक/युवतींना जपान कंपनीच्या प्रतिनिधी / कर्मचाऱ्यां सोबत प्रश्नोत्तरे आणि संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमांतील विषय सविस्तरपणे समजण्यास सुलभ होण्यासाठी या कार्यक्रमाच्या चित्रफीती मध्ये “तागालोख, खमेर, नेपाली, मंगोलियाई, इंडोनेशियाई, विएतनामी, थाई, सिंहल, उज्बेक व हिंदी” या १० भाषांमध्ये उपशीर्षक उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. भविष्यात SSW टेस्ट देणाऱ्या युवकयुवतींना सुध्दा या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. तसेच विशिष्ट कुशल कामगार रुपात काम करु इच्छीणाऱ्या उमेदवारांना देखील या कार्यक्रमामध्ये भाग घेता येईल.
Specified Skilled Workers Programme (SSW) कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी युवकांनी त्यांच्या मोबईलवर LINEAPP डाऊनलोड करुन त्याद्वारे खालील क्युआर कोड स्कॅन करुन सहभाग नोंदवावा. LINEAPP च्या माध्यमातुन आपण माहिती व दिनांक निवडु शकता. तसेच आपण LINEAPP द्वारे संदेश सुद्धा प्राप्त करुन घेऊ शकता. नर्सिग सेक्टरमध्ये कुशल असणाऱ्या व परदेशात जावुन काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असुन, या संधीचा जास्तीत जास्त युवक/युवतींनी लाभ घ्यावा आणि जपानच्या SSW या कार्यक्रमात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे आयुक्त दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.