Thursday, July 18, 2024
Homeमहत्वाची बातमीचारही नगरपंचायत निवडणुकीत भाजप एकतर्फी विजय मिळवेल

चारही नगरपंचायत निवडणुकीत भाजप एकतर्फी विजय मिळवेल

उद्योगमंत्री नारायण राणे यांचा विश्वास

संतोष राऊळ (पडवे)

नगरपंचायत निवडणुकीमध्ये आमचा एकतर्फी विजयी होणार आहे, असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. आगामी नगरपंचायत तसेच जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पडवे मेडिकल कॉलेजच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, डॉ.मिलिंद कुलकर्णी, संदीप कुडतरकर आदी उपस्थित होते.

शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेस या तिन्ही राजकीय पक्षांचे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, आरोग्य अशा कोणत्याही क्षेत्रात विधायक काम नाही. एकतर्फी टीका करून स्वार्थाची पोळी भाजून घ्यायची या पलीकडे या तिन्ही पक्षांचे कोणतेही काम नाही. देवगड, वैभववाडी, कुडाळ, दोडामार्ग या शहरात भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही काम केले आहे. विकासकामे केली आहेत.विधायक कामे करत आहेत. कोरोना काळात आम्ही जनतेला उपचार दिले. सर्व सोयीसुविधा दिल्या. मात्र राज्यात सत्ता असताना या तिन्ही पक्षाच्या सरकारने काहीही केले नाही. त्यामुळे कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंना ठाकरे सरकार जबाबदार आहे, अशा शब्दांत राणे यांनी आघाडी सरकारचे वाभाडे काढले.

आघाडी सरकारला लक्ष्य करताना, ठाकरे सरकार म्हणजे सावळा गोंधळ असल्याचे सांगतानाच, कोणाच्या आशीर्वादाशिवाय पेपर फुटतात काय, असा प्रश्न विचारला आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. राज्यातील बँका, साखर कारखाने कोणी लुटले? ईडीची चौकशी कोणाची सुरू आहे? कोणाचे आशिर्वाद असल्याशिवाय परीक्षेचे पेपर फुटतात काय? या सर्वांचा आढावा घ्या. म्हणजे ठाकरे सरकार कोठे चालले आहे ते कळेल. हे सरकार म्हणजे सावळागोंधळ आहे. मुख्यमंत्री आयसीयूत आता घरी आले आहेतआणि मंत्री त्यांच्या कामात गर्क आहेत. जनतेच्या हिताची, त्यांची काळजी करण्याची कोणाल पडलेली नाही. अशी टीका राणे यांनी केली.

सचंयनी घोटाळा प्रकरणाची केस लवकरच निकाली काढून दोषींवर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करू, असे ज्येष्ठ नेते नारायण राणे म्हणाले.
सचंयनी घोटाळा प्रकरणाची केस कुडाळ कोर्टात सुरू आहे. सचंयनीत अफरातफरी करणारा माणूस सेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या पॅनल मध्ये आहे. गेली काही वर्षे जिल्हा बँकेची सूत्रे हीच माणसे चालवत आहेत. त्याच्या कामाची चौकशी करायला लावणार. तसेच सचंयनी घोटाळा प्रकरणाची केस लवकरच निकाली काढून दोषींवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ठेवीदार जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आमचा वकील कोर्टात ही केस लढविण्यासाठी उभा करणार आणि दोषींवर कारवाई आणि ठेवीदारांना न्याय मिळवून देणार असल्याचे नारायण राणे म्हणाले. जिल्हा बँकेचा मतदार विचार करणारा आणि सुज्ञ आहे.अशा भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना ते निवडून देणार नाही. फक्त भाजप उमेदवाराला निवडून देतील असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

कुडाळमध्ये घेणार जाहीर सभा

सिंधुदुर्ग जिल्हात होणाऱ्या नगर पंचायत निवडणुका आणि जिल्हा बँक निवडणुकीसाठी मी कालपासून जिल्हा दौऱ्यावर आलो आहे. आता या निवडणुका पूर्ण करून दिल्लीला जाणार आहे. जिल्हा बँक निवडणूक आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी सभा होणार आहेत. त्यात देवगड,वैभववाडी, कुडाळ, दोडामार्ग या ठिकाणी मी बैठका घेणार आहे. कुडाळ येथे जाहीर सभा होणार आहे, असे केंद्रीयमंत्री राणे यांनी सांगितले. भाजपाचेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी जनतेत काम करत आहे.आणि कोरोना काळात सुद्धा आम्हीच विधायक काम करत आहे. त्यामुळे जनता आम्हालाच निवडून देणार आहे, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -