मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात यायला लागल्यानंतर मुंबईतील निर्बंधांमध्ये शिथीलता आणली गेली. यामुळे १ ते ७ वीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र काही शाळांनी ऑनलाईन शिक्षण बंद केले आहे. अशा शाळांना ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत सूचना दिल्या जातील व नंतर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान मुंबईतील महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी शाळेत विद्यार्थ्यांना पाठवायचे की नाही? हा सर्वस्वी निर्णय पालकांचा असणार आहे. अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत संमती दिलेले नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण देण्यात यावे अशा शिक्षण विभागाच्या सूचना असतानाही अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण बंद केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान अशा शाळांना पालिकेच्या शिक्षण विभागाकडून आधी ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत सूचना दिल्या जातील. जर ऑनलाईन शिक्षण सुरू केले नाही तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
मुंबईत ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्यापासून अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास संमती दिली नसून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मात्र काही शाळा ऑनलाईन शिक्षण देत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पालिका अशा शाळांवर कारवाई करणार आहे.