मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीमध्ये कोरोनाची सुपरस्प्रेडर ठरलेला राज्य सरकारमधील एक मंत्रीही सहभागी झाला होता, असा गंभीर आरोप भाजपचे नेते आशीष शेलार यांनी केला आहे.
या पार्टीत सहभागी झालेल्या अनेक कलाकारांना तसेच त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. दरम्यान, कोरोनाच्या सुपरस्प्रेडर ठरलेल्या या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील एक मंत्रीही सहभागी झाला होता, असा गंभीर आरोप भाजप नेते आशीष शेलार यांनी केला आहे.
या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आशीष शेलार म्हणाले, करण जोहर यांच्या घरी झालेल्या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील कुणी मंत्री होता का, हा संशय बळावायचा नसेल, तर त्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज महानगरपालिकेने जाहीर करावेत. तसेच जर कुणी मंत्री त्या पार्टीत सहभागी झाला असेल, तर त्याने ते स्वत:हून जाहीर करावेत, असे शेलार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पार्टीनंतर सर्वप्रथम सीमा खानला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आले होते. यावेळी करिना कपूर-खान, अमृता अरोराही उपस्थित होत्या. ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. ११ डिसेंबर रोजी सीमा खानचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. करिना खान आणि अमृता अरोराही कोरोना संक्रमित आढळल्या होत्या. आता मंत्रिमंडळातील नेमका मंत्री कोण? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.