
चंद्रपूर : पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता घडली. यामुळे खळबळ माजली आहे.
मागील महिन्याभरापासूनत पोंभुर्णा तालुक्यात वाघाने चार बळी घेतले आहेत. दरम्यानच्या, काळात वनविभागाने गस्त वाढविली असून वाघाच्या हालचालीवर नजर ठेवली होती. मात्र आज पुन्हा वाघाने हल्ला करीत महीलेचा बळी घेतला. घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलीस विभाग घटनास्थळी दाखल झाले. मात्र या घटनेने तालुक्यात दहशत पसरली आहे.
पोंभुर्णा वनपरिक्षेत्रातील वेळवा येथील संध्या विलास बावने (३५) ही महिला पोंभुर्णा नियतक्षेत्रात गेली होती. त्यावेळी अचानक वाघाने हल्ला करीत तिला जागीच ठार केले. ती वेडसर असून अशीच भटकत जंगलात गेल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.
पोंभुर्णा तालुक्यात वाघाची दहशत आजही कायम आहे. पोंभुर्णा वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या कसरगट्टा गावातील शेतशिवारात वाघाने केलेल्या हल्ल्यात मागील महिन्याच्या २४ तारखेला एक महिला ठार झाल्याची घटना घडली होती. मात्र त्या ठिकाणापासून सदर भाग लांब असून हा हल्लेखोर दुसरा वाघ असल्याची पुष्टी सूत्रांनी जोडली.