नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या लखीमपुर खेरीमध्ये (Lakhimpur Kheri Incident) केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी (Ajay Mishra Teni) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) यांनी आपल्या गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचे देशभरात गंभीर पडसाद उमटले होते. त्यानंतर आज लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Winter Session) हा मुद्दा चर्चेत आहे. संसदेत आज विरोधी पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांनी अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, सभागृहाच्या बाहेर देखील काँग्रेस खासदारांनी यावरून आंदोलन केले.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज संसदेत आक्रमक भूमिका घेतली. “सभागृहात लखीमपूर खेरी येथे झालेल्या हत्येबद्दल बोलण्याची परवानगी दिली पाहिजे. याबद्दल असंही म्हटलं जातंय की, हा कट होता. शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, त्यांना शिक्षा झाली पाहिजे” अशी मागणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे.
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आज संसदेत गदारोळ केला. त्यानंतर सभागृहाचं कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आलं.
लखीमपूर खेरी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने हा प्रकार म्हणजे पूर्वनियोजित कट होता, असा निर्वाळा आपल्या अहवालात दिल्यानंतर यावरून मोदी सरकारवर दबाव वाढू लागला आहे. केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचा मुलगा आणि या प्रकरणातील प्रमुख आरोपी आशिष मिश्रा आणि त्याच्या साथीदारांनी जाणूनबुजून शेतकऱ्यांना गाडीने चिरडण्याचं कृत्य केल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यावरून राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.