Thursday, July 3, 2025

आई भोवती फिरणारी ‘तुमची मुलगी करते काय?’

आई भोवती फिरणारी ‘तुमची मुलगी करते काय?’

संजय कुलकर्णी


रहस्यमय, गूढकथा वाचणारे वाचकवर्ग खूप आहेत. त्यामुळे त्यावर नाटकं आणि चित्रपट बऱ्यापैकी निघाले. ते हिट देखील झाले. वाहिनींचे युग सुरू झाले तेव्हा रहस्यमय मालिकांची निर्मिती करावी की, करू नये, या संभ्रमात निर्माते आणि वाहिनीवाले होते. त्याला टीआरपी किती मिळेल, यावर त्याचे यश हे अवलंबून होते.

आज या घडीला प्रत्येक वाहिनीवर एखाद-दुसरी गूढ रहस्यमय मालिका सुरू आहे. झी मराठीवर ‘ती परत आलीये’ या मालिकेचे १०० भाग होऊनही अजून रहस्य उलगडलेले नाही. या मालिकेने शंभरचा टप्पा गाठणं कौतुकास्पद आहे. एकामागून एक होणाऱ्या हत्येचा उलगडा आता लवकरच होणार आहे. त्या मागे ‘ती’ आहे की, ‘तो’ याचं उत्तर मिळणार आहे. तसेच देवमाणूस या मालिकेने लोकप्रियतेचा कळस गाठला होता. ती मालिका बंद झाली. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादमुळे ‘देवमाणूस २’ मालिका झी मराठीवर सुरू होत आहे. तिचा पहिला भाग रविवार, १९ डिसेंबरला रात्री ९ वाजता प्रसारित होईल.

सध्या प्रत्येक वाहिनीवर एका मालिकेची जाहिरात सातत्याने दिसतेय. ती मालिका म्हणजे ‘तुमची मुलगी करते काय?’ मालिकेचं नाव ‘आई कुठं काय करते’ या मालिकेच्या जवळपास असलं तरी ती थरार मालिका आहे. ते कथानक सुद्धा आई भोवती जरी फिरत असले तरी, आपल्या मुलांच्या चुका पदरात घेणारी आणि वेळप्रसंगी मुलांची ढाल होणारी आई, अशी तिची दुहेरी रूपं त्या व्यक्तीरेखेतून दिसणार आहेत. मालिका कौटुंबिक नसून थरारक आहे. मुग्धा गोडबोले यांनी संवाद लिहिलेले असून कथा-पटकथा चिन्मय मांडलेकर यांची आहे. चिन्मय हा सातत्याने चांगलं करीत आलाय, मग ते नाटक असो की मालिका. त्यामुळे या मालिकेची उत्कंठा प्रेक्षकांना आहे.

मधुरा वेलणकर ही गुणी अभिनेत्री या मालिकेतील आईची भूमिका करीत असून एक शिक्षिका, कर्तव्यदक्ष आई आणि स्वतःच्या मुलीवर बेतल्याने वाघीण झालेली आई अशा तिहेरी भूमिकेत ती दिसेल. भीमराव मुंडे हा दिग्दर्शक त्याच्या प्रत्येक कलाकृतीत नावीन्य शोधाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात तो यशस्वी होतोय. तो या मालिकेचा दिग्दर्शक आहे. अभिनेत्री मनवा नाईक ही मालिकेची निर्माती आहे. तुमची मुलगी काय करते ही मालिका २० डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे
Comments
Add Comment