नवी दिल्ली : गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात चर्चेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी आता उठवण्यात आली आहे. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चार वर्षांपूर्वी सर्वोच्च सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. याप्रकरणी गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते.
महाराष्ट्राने बैलगाडा शर्यत सुरू करण्याच्या संदर्भात २०१७ मध्ये एक कायदा संमत केला होता. मात्र, त्यावर मुंबई हायकोर्टाने शर्यतीवर बंदी कायम ठेवली होती. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. काल राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करण्यात आला होता. त्याआधी शुक्रवारी पेटा या संस्थेकडून बाजू मांडण्यात आली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली. या निर्णयामुळे राज्यातील बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.