Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्र

बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या निर्णयाचे अजित पवारांकडून स्वागत

बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या निर्णयाचे अजित पवारांकडून स्वागत

मुंबई : “राज्यातील बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले असून हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा, पशुधनाचं संरक्षण, संवर्धन करणारा ठरेल. या निर्णयानं बैलधारक शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली आहे. हा राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. या लढाईत शरद पवार यांनी लक्ष घातले. मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासारख्या नेत्यांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही लढाई ध्येयनिष्ठेने, संपूर्ण ताकदीने लढली. या लढाईत सहभागी सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. आभार मानतो. महाविकास आघाडी सरकारने सर्वशक्तिनिशी या न्यायालयीन लढाईला बळ दिले. त्यातून मिळालेले हे यश राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण करेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला आनंद व्यक्त केला.

बैलगाडा शर्यती आता राज्यात पुन्हा सुरु होतील. मात्र, शेतकऱ्यांनी सर्व अटी, नियमांचे पालन करण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवण्यासंदर्भात आज दिलेल्या निर्णयावर पुन्हा घटनापीठ विचार करणार असले तरी, तिथेही शेतकऱ्यांचाच विजय होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment