Sunday, October 26, 2025
Happy Diwali

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार बाळासाहेब ठाकरे आणि त्याआधी वीर सावकर यांनी रुजवले - संजय राऊत

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार बाळासाहेब ठाकरे आणि त्याआधी वीर सावकर यांनी रुजवले - संजय राऊत

नवी दिल्ली : “चंद्रकांत पाटील काय म्हणतात त्यावर भूमिका ठरत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली का हे माहिती नाही, मात्र त्यांनी या देशातील सर्वात पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचाच विचार हिंदूह्रदयम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्याआधी वीर सावकर यांनी महाराष्ट्रात आणि देशात रुजवला,” असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“बाळासाहेबांना हिंदूह्रदयसम्राट अशी उपाधी देशातील जनतेने दिली. ज्याप्रमाणे मराठी माणसाला मराठी म्हणून मत द्यायला लावलं, त्याप्रमाणे एक दिवस देशातील हिंदूंना मी हिंदू म्हणून मत द्यायला लावीन असं बाळासाहेब ठाकरेंनी सांगितल्याच प्रमोद महाजन म्हणाले होते. बाळासाहेबांनी १९९२ नंतर करुन दाखवलं. पार्ल्यातील पोटनिवडणुकीत शिवसेना प्रथम हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली. तेव्हा हिंदू म्हणून आपण निवडणूक लढायला हवी असा विचार तेव्हा कोणाच्याही मनात आला नव्हता. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या आमदारांचं निलंबनही झालं होतं. रमेश प्रभू, सुर्यकांत महाडिक आणि आणखी एका आमदाराला हिंदू व्होट बँक म्हणून मतं मागितल्याने तसंच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढल्याने अपात्र ठरवण्यात आलं होतं,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

कोणी कोणत्या भ्रमात आहेत माहिती नाही. पण या देशाची जनता बाळासाहेबांचं योगदान कधी विसरणार नाही,” असं यावेळी ते म्हणाले.

“अयोध्येत बाबरीचं पतन होत असताना सध्याचे हिंदू व्होट बँकवाले पळून गेले आणि शिवसेना, शिवसेनाप्रमुख ठाम उभे राहिले. बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा आम्हाला गर्व आहे हा त्याचाच एक भाग होता. आमचं हिंदुत्व पळपूटं आणि शेपूट घालणारं नाही. आम्ही ठामपणे उभे राहतो, लढतो आणि विजय प्राप्त करतो. फक्त राजकारणासाठी, निवडणुकांच्या सोयीसाठी, मंदिरांसाठी आमंच हिंदुत्व नाही. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार यासंदर्भात ते आहेत,” असं त्यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “व्होट बँकेचं राजकारण ज्यांना करायचं आहे त्यांना करु देत. पण इतिहासाची पानं पुन्हा एकदा चाळली पाहिजेत. बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर असलेली ही पानं कधीच कोणाला फाडता आणि पुसता येणार नाहीत.

Comments
Add Comment