पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुणे दौऱ्यावर येण्याच्या आदल्या दिवशीच रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. आता रुपाली पाटील शिवबंधनात अडकणार की मनगटावर घड्याळ बांधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसेच्या माजी नगरसेविका आणि महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाचा राजीनामा राज ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. पक्षातील अंतर्गत वादामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिला असला तरीही, सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे नाव ह्रदयात दैवत म्हणून कोरलेले कायम राहील, असे त्यांनी फेसबुकवर म्हटले आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याची वेळ साधून पक्षाचा राजीनामा रुपाली पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, राजीनामा देण्याआधी रुपाली यांनी युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची भेट घेतली होती. सह्याद्री अथितीगृहावर झालेल्या भेटीचा फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर त्या शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगली. तर त्याआधी रुपाली पाटील या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भेटल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीत जाणार असेही म्हटले जात आहे. राजीनाम्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. अद्याप तरी त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
रुपाली पाटील या पेशाने वकील आहेत. मनसेच्या स्थापनेपासून गेली १४ वर्षे त्या राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीत त्या मनसेच्या तिकिटावर नगरसेवक झाल्या. पुढच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतरही त्या राजकारणात सक्रीय असून विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत त्यांची कसबा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा होती. मात्र त्यांच्याऐवजी मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांना तिकिट मिळाले. त्यामुळे नाराज झालेल्या रुपाली पाटील यांच्या मनात तिकिट कापल्याची भावना होतीच. अनेकदा मुलाखतींमधून त्यांनी पक्षातील अंतर्गत वादावर अप्रत्यक्ष वक्तव्यं केलं होतं.
मनसेला जय महाराष्ट्र करण्याच्या चर्चा जेव्हा जेव्हा झाल्या तेव्हा रुपाली पाटील या आपण मनसेतच असल्याचे सांगत होत्या. आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षात जाणार याकडे लक्ष लागले आहे.