नवी दिल्ली : ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. गेल्या 8 डिसेंबर रोजी तामिळनाडूत झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान आज, बुधवारी बंगळुरू येथील रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
यासंदर्भात ट्विटरवर शोकसंदेश जारी करताना पंतप्रधान म्हणाले की, ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांनी अभिमानाने, शौर्याने आणि अत्यंत कार्यकौशल्याने देशाची सेवा केली. त्यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांचे देशासाठीचे भरीव योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या कुटुंबियांप्रति आणि मित्रांप्रति सहवेदना व्यक्त करत असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात नमूद केलेय.