Friday, May 23, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

एम.आय.डी.सी. विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा

एम.आय.डी.सी. विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा

देवा पेरवी


पेण : तालुक्यातील प्रस्तावित डोलवी औद्योगिक विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळामार्फत भूसंपादन होणार आहे. या भूसंपादनाच्या विरोधात येथील शेतकरी १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता हजारोच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे मोर्चाने धडकणार आहेत.



पेण तालुक्यातील डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी काराव-गडब, डोलवी, वडखळ, बोरी ग्रामपंचायत परिसरातील बेणेघाट, कोलवे, वावे, डोलवी, खारकारावी, काराव, खारमांचेळा, खारघाट, खारचिर्बी, खारजांभेळा, खारढोंबी या गावांतील २११० एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने नियोजित डोलवी औद्योगिक प्रकल्पासाठी सुमारे २११० एकर जमिनीसाठी अधिसूचना काढली आहे.


सदरच्या जमिनीची मागणी खासगी कंपनीने केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळामार्फत भूसंपादन कायद्याअंतर्गत पास थ्रू पद्धतीने दिली जाणार आहे. सदरच्या भूसंपादनास शेतकऱ्यांनी व ग्रामपंचायतीनी निवेदनाद्वारे विरोध दर्शवला आहे. ३२/२ च्या वैयक्तिक नोटिसींना बाधित शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या आहेत. ३२/२ च्या हरकतीवर उपविभागिया अधिकाऱ्यांनी घेतलेल्या सुनावणीदरम्यान तोंडी व लेखी विरोध नोंदवला आहे.



शेतकरी संघर्ष समिती (११ गाव) गडब-पेण यांनी वेळोवेळी औद्योगिक प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. ग्रामपंचायतींनी मासिकसभेत व ग्रामसभेत नियोजित डोलवी औद्योगिक विकास प्रकल्पाविरोधात ठराव पारित करून शासनास कळवले आहे. त्याचप्रमाणे उद्योगमंत्री, पालकमंत्री, महसूल मंत्री, खासदार, आमदार, विरोधी पक्ष नेते सर्व पक्षीय नेते मंडळी यांना सदर प्रकल्प रद्द करावा, यासाठी प्रत्यक्ष भेटून विरोध दर्शवला आहे.



ज्या कंपनीसाठी हे भूसंपादन होत आहे त्या कंपनीने येथील पिकती भात शेती नियोजनपूर्वक शासनातील काही अधिकारीवर्गास हाताशी धरून कंपनीच्या मोठमोठ्या मालवाहू बोटी जेटीवर येण्यासाठी खाडीचे खोलीकरण केले. त्यामुळे खाडीच्या संरक्षण बांधांना मोठमोठ्या खांडी गेल्या. त्यातून मोठ्या प्रमाणावर खारेपाणी शेतीत शिरून पाच-सहा वर्षांपासून शेती नापिक झाली आहे.

Comments
Add Comment