मुंबई – बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा (shaharukh khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. आर्यनची यापुढील काळामध्ये पोलिसांना किंवा इतर कुठल्याही यंत्रणेला चौकशी करायची असल्यास तीन दिवस अगोदर त्याची पूर्वकल्पना द्यावी, असे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात संशयित आरोपी म्हणून एनसीबीने आर्यन खानला अटक केली होती. त्याला काही दिवस चौकशीसाठी कोठडीतही ठेवण्यात आले होते.
आर्यन खान प्रकरणात आज झालेल्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने सांगितले की, दर आठवड्याला मुंबईच्या एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट आर्यनला शिथिल करण्यात आली आहे. तसेच दिल्लीच्या एनसीबीला चौकशी करायची आवश्यकता वाटली तर ७२ तास आधी आर्यनला नोटिस द्यावी लागेल त्यानंतर त्याची चौकशी होईल.
आर्यनने आपल्यावर ज्या जाचक अटी आहेत त्याच्याविरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती. त्यामध्ये त्याने त्या अटींचा सहानुभूतीने विचार करुन त्या शिथिल करण्यात यावे, असे म्हटले होते.
न्यायाधीश सांबरे यांच्या खंडपीठाने या प्रकरणाबाबत सुनावणी केली. तसेच अॅड. अमित देसाई यांनी आर्यन खान साठी युक्तीवाद केला. सध्या या प्रकरणाचा तपास दिल्ली एसआयटी करत आहे. ड्रग्ज प्रकरणामध्ये आर्यन खान सहित मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना २८ ऑक्टोबरला न्यायालयाने जामीन दिला होता. तसेच १४ अटींचे पालन करण्यास न्यायालयानं बजावले होते.