
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपीन्समध्ये अटक करून भारतात आणण्यात आले आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांची टीम दिल्लीत दाखल झाली आहे.
पुजारी हा १५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून फरार होता आणि ऑक्टोबरमध्ये फिलिपीन्समध्ये त्याला अटक केली गेली होती. त्याच्याविरोधात ठाण्यात जबरदस्ती वसुलीचे २३ गुन्हे दाखल आहेत. सुरेश हा गँगस्टर रवी पुजारीचा जवळचा नातलग आहे आणि २००७ मध्ये त्याच्यापासून तो वेगळा झाला होता. त्यानंतर तो परदेशात पळून गेलेला होता. सुरूवातीच्या काळात त्याने रवी पुजारी आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन सोबत काम केलं आणि नंतर त्याने स्वत:ची गँग तयार केली होती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
सुरेश पुजारीला ऑक्टोबर महिन्यात अटक करण्यात आली होती. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. याशिवाय मुंबई आणि कर्नाटकात वसुलीच्या अनेक प्रकरणांमध्ये तो पोलिसांना हवा होता. आयबी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पुजारीला दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतले. केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीनंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. मुंबई गुन्हे शाखेची एक टीम पुजारीला ताब्यात घेण्यासाठी अगोदरच दिल्लीत पोहोचलेली आहे. मुंबई आणि ठाणे पोलिसांनी जबरदस्ती वसुलीच्या अनेक प्रकरणांनंतर २०१७ आणि २०१८मध्ये त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील काढली होती.