Monday, May 12, 2025

महामुंबईराजकीयमहत्वाची बातमी

दरेकर, तुम्ही मजूर आहात का?

दरेकर, तुम्ही मजूर आहात का?

मुंबई - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin darekar) यांनी मुंबई बँक (Mumbai Bank) निवडणुकीसाठी मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केल्याने त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने दरेकर यांना सहकार विभागाने नोटीस (Notice) बजावली आहे. या नोटिशीत आपण मजूर आहात की नाही? अशी विचारणा करण्यात आली आहे.


यापूर्वीही दरेकर मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. दरम्यान आताही त्यांनी मजूर संस्थेमार्फत मुबै बँक निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. पण याबाबत आक्षेप घेण्यात आला आहे.


तसेच दरेकर यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता २ कोटी ९ लाख रुपये असल्याचे दाखवले आहे.


दुसरीकडे विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर यांना २ लाख ५० हजार मानधन मिळत आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर प्रथमदर्शनी मजूर असल्याचे दिसून येत नाही, असे या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.


मजूर संस्थेच्या नियमानुसार मजूर व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष अंगमेहनतीचे व शारिरीक श्रमाचे काम करणारा व्यक्ती असून तिचे उपजीविकेचे साधन मजुरीवर अवलंबून असले पाहिजे. याबाबत प्रविण दरेकर यांना २१ डिसेंबर रोजी विभागीय सहनिबंधक कार्यालयात येऊन म्हणणे मांडण्याबाबत नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.


दरम्यान, सहकारी बँकांमधील (Co-operative bank) कारभार पारदर्शक व्हावा, यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेककडून प्रयत्न केले जातात. मात्र, राजकारण्यांकडून या नियमांना सोईस्कररित्या बगल दिली जाते. मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत याचे तंतोतंत प्रत्यंतर येताना दिसत आहे.


जानेवारी महिन्यात मुंबै बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी मुंबै बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांनी हा अर्ज मजूर संस्था प्रवर्गातून दाखल केला आहे. त्यामुळे कोट्यवधींची संपत्ती असलेले प्रवीण दरेकर 'मजूर' कसे ठरु शकतात, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment