Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीशहापूरमधील वीट व्यावसायिक कर्जाच्या ओझ्याखाली

शहापूरमधील वीट व्यावसायिक कर्जाच्या ओझ्याखाली

शिवाजी पाटील

शहापूर : शहापूर तालुक्यात भातशेतीसोबत अनेक शेतकरी आता जोड व्यवसाय म्हणून वीट उत्पादन क्षेत्रात उतरले असून पावसाळा संपला की विटा तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. मात्र यावर्षी अवकाळी पावसाने मोठे नुकसान केल्याने वीटभट्टी व्यावसायिक संकटात सापडले असून वीटभट्टी व्यवसायिक कर्जाच्या ओझ्याखाली सापडले आहेत.

पावसाने पटावर टाकण्यात आलेल्या लाखोंच्या विटांचा पार चिखल झाल्याने विटव्यवसायासाठी घेतलेले कर्ज आणि त्यावरील व्याज भरताना व्यवसायिकांच्या नाकीनऊ आले आहेत. विटांचे उत्पन्न मिळण्यावर कर्जफेडीचे गणित चुकल्याने ते कर्जाच्या ओझ्याखाली सापडले आहेत़
एकतर वाढत्या महामागाईने भातशेतीही तोट्यात जात आहे, असे असताना वीट व्यवसायातही लागणारा कच्चा माल, माती, कोळसा, भुसा, मजूर, यांच्या वाढलेल्या किमती आणि रॉयल्टीमुळे बेजार झालेले व्यावसायिक पावसाने पार हतबल झाले आहेत.

कोरोनामुळे एकीकडे मजुरांची कमतरता भासत आहे त्यामुळे त्यांचे दरही प्रचंड वाढले आहेत़ त्यातच सुगीची कामे संपल्याने महिनाभर केलेल्या वीट व्यवसायासाठीचे पट, मातीपासून तयार केलेल्या विटांवर पाणी फेरल्याने मोठया प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागत आहे
रब्बी शेतीचे ४५० हेक्टर क्षेत्रावर नुकसान

अवकाळी पावसामुळे तालुक्यातील रब्बी हंगामात पेरले गेलेली कडधान्य उडीद, मूग, वाल, हरभरा चवळी ही शेतकऱ्याला वर्षभर तारणहार ठरणारी कडधान्ये पावसातच कुजल्याने ती हातची गेल्यात जमा झाली आहेत. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार ४५० हेक्टरवर रब्बी पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. बदलते हवामान, ढगाळ वातावरण, अचानक वाढणारी थंडी, तापमान यामुळे भाजीपालापिकांवरही अनेक प्रकारच्या बुरशींचा प्रादुर्भाव होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत़ त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरीही मोठया संकटात सापडले आहेत़

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -