नवी दिल्ली : भाजपच्या (BJP) १२ आमदारांच्या (MLA) निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) सध्या तरी कोणताही आदेश दिलेला नाही. याबाबत पुढील सुनावणी ११ जानेवारीला होणार आहे. जुलै महिन्यात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टात सुनावणीनंतर आता राज्य सरकारला नोटीस पाठवण्यात आली आहे.
अधिवेशन सुरु असताना विधानसभा सभागृहात या आमदारांनी गोंधळ घातला होता. याशिवाय तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन करण्यात आलं होतं. यानंतर भाजपच्या तब्बल १२ सदस्यांवर विधानसभेत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. एक वर्षासाठी ही निलंबनाची कारवाई होती. निलंबित झालेल्या आमदारांमध्ये संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, पराग अळवणी, हरीश पिंपळी, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तिकुमार (बंटी) बागडिया यांचा समावेश आहे.