Monday, May 12, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

बेळगावात कडकडीत बंद

बेळगावात कडकडीत बंद

बेळगाव : महाराष्ट्र मध्यवर्ती एकीकरण समितीचे (Maharashtra ekikaran samiti) बेळगाव शहर अध्यक्ष दीपक दळवी (Deepak Dalvi) यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ आज आयोजित केलेल्या बेळगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


बेळगावात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून बेळगाव (Belgaum) शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. अनेक गावातील बससेवाही खंडित झाली असून बंदचे पडसाद उमटण्यास सुरवात झाली आहे. (Belgaum Band) सकाळपासूनच बेळगावसह उपनगर, सीमाभागातील व्यवहार कडकडीत बंद होते. अनेक मंडळांनी फलकावर बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.


कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी व्हॅक्सिन डेपो येथे सोमवारी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती. याच्या निषेधार्थ समितीतर्फे बेळगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत मराठी भाषिकांनी सकाळपासूनच आपले व्यवहार बंद ठेवले असून सोमवारी रात्री काही ठिकाणी बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील बससेवाही (Transport Service) विस्कळीत झाली आहे. बसचे नुकसान होऊ नये यासाठी काही भागातील बससेवा परिवहन मंडळाने बंद ठेवली आहे.


परिसरातील येळ्ळूर, बेळगुंदी, हिंडलगा आदी गावांमध्येही बंदला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या अनेक रस्त्यांवर पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असणाऱ्या पांगुळ गल्लीमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन पाठिंबा दर्शवला आहे. शहराबरोबरच खानापूर येथेही बंदला चांगला प्रतिसाद मिळला असून या भागातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.

Comments
Add Comment