Saturday, May 10, 2025

देशक्रीडाताज्या घडामोडी

कोहलीची वनडे मालिकेतून माघार

कोहलीची वनडे मालिकेतून माघार
नवी दिल्ली/मुंबई (वृत्तसंस्था): माजी कर्णधार विराट कोहलीने वैयक्तिक कारणास्तव आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या वनडे मालिकेतून माघार घेतली आहे. उभय संघांमधील तिसऱ्या आणि अंतिम कसोटीतही तो खेळण्याबाबत साशंकता आहे. मुलगी झीवा हिच्या पहिल्या वाढदिवसासाठी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला ‘ब्रेक’ मिळावा, असे त्याने बीसीसीसीआयला कळवले आहे.

भारत आणि द. आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका १९ ते २३ जानेवारी २०२१ या कालावधीत खेळली जाणार आहे. विराटची मुलगी झीवा हिचा वाढदिवस ११ जानेवारीला आहे. टी-ट्वेन्टी वर्ल्डकप झाल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-ट्वेन्टी मालिकेत आणि पहिल्या कसोटीसाठी विराटने विश्रांती घेतली होती. भारताच्या आफ्रिकन दौऱ्याची सुरुवात २६ डिसेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या सेंच्युरियन कसोटी मालिकेने होणार आहे. उर्वरित दोन कसोटी सामने ३ ते ७ आणि ११ ते १५ या कालावधीत पार्ल येथे होतील.


दोन्ही कर्णधार एकत्र खेळण्याची शक्यता कमी


आगामी द. आफ्रिका दौऱ्यात विराट कोहली तसेच रोहित शर्मा हे अनुक्रमे कसोटी तसेच झटपट प्रकारांतील कर्णधार एकत्र खेळण्याची शक्यता कमी आहे. वनडे आणि टी-ट्वेन्टी कर्णधार रोहित हा स्नायू दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून ‘आउट’ झाला आहे. त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी किमान तीन आठवडे लागतील, असे बीसीसीआयने म्हटले आहे. गंभीर दुखापत पाहता वनडे मालिकेसाठी तो उपलब्ध असण्याबाबत साशंकता आहे.

तिसऱ्या कसोटीत विराट न खेळल्यास नेतृत्वाची धुरा कुणाकडे जाणार, याची उत्सुकता आहे. उपकर्णधार रोहित या मालिकेत खेळणार नाही. रोहितच्या जागी नव्या व्हाइस कॅप्टनची निवड झालेली नाही. कसोटी उपकर्णधारपदासाठी माजी उपकर्णधार आणि अनुभवी अजिंक्य रहाणेचे नाव आघाडीवर आहे. काहीच दिवसांपूर्वी विराटकडून वनडे प्रकाराचे कर्णधारपद काढून घेण्यात आले आणि रोहितकडे ही जबाबदारी सोपण्यास आली होती. त्यापूर्वी, टी-ट्वेन्टी वर्ल्डकपनंतर रोहितला या प्रकाराचा पूर्णवेळ कर्णधार नेमण्यात आले.
Comments
Add Comment