Tuesday, July 23, 2024
Homeमहत्वाची बातमीनागपूरात चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय

नागपूरात चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय

महाविकास आघाडीची 44 मतं फुटली

नागपूर : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नागपूरच्या जागेवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी दणदणीत विजय मिळवला.

महाविकास आघाडीची 44 मते फुटली असून काँग्रेसचे छोटू भोयर यांना फक्त एक मत मिळाले. काँग्रेसने ऐनवेळी छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला होता. मात्र, त्यांना अवघी 186 मतं मिळाली आहेत. तर, चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मतं मिळाली आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला असून त्यांना महाविकास आघाडीचीही काही मते मिळाली आहेत.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे झाली. या निवडणुकीत 10 डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान झाले. मतदानाची टक्केवारी 98.93 टक्के इतकी होती. यात 283 महिला आणि 271 पुरुष मतदारांचा समावेश होता. एकूण 560 पैकी 554 मतदारांनी मताधिकार बजावला होता.

महाविकास आघाडीत नव्हते एकमत

उमेदवारी देताना काँग्रेसमध्ये एकमत नव्हतं. सुरुवातीला राजेंद्र मुळक यांचं नाव समोर करण्यात आलं. परंतु, त्यानंतर संघाचा स्वयंसेवक आयात करण्यात आला. नाना पटोले यांनी छोटू भोयर यांना आयात केलं. पण, ऐन प्रचाराच्या वेळेत भोयर कमी पडले, असा आरोप सुनील केदार यांनी केला. त्यामुळं सुनील केदार यांनी पुढाकार घेऊन उमेदवार वेळेवर बदलविला. अपक्ष मंगेश भोयर यांना काँग्रेसनं पाठिंबा दिला. राष्ट्रवादीची सुरुवातीपासूनच नाराजी होती. आम्हाला उमेदवारी अर्ज करताना बोलावलं नाही, असं राष्ट्रवादीचे नेते म्हणाले होते. शिवसेनाही मनातून काँग्रेस उमेदवाराच्या पाठीमागं नव्हती. या साऱ्यांचा फटका महाविकास आघाडीला बसला.

येत्या महापालिका निवडणुकीवर या निवडणुकीचा परिणाम होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला याचा फटका बसेल असं चित्र आहे. भाजपचे नगरसेवक एकत्र आले. त्यांनी बावनकुळे यांना निवडून दिले. आता बावनकुळे यांनी नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घातलं तर याचा नक्कीच भाजपला फायदा होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -