काबुल (वृत्तसंस्था): अफगाणिस्तान क्रिकेट संघ मार्चमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यात उभय संघ तीन सामन्यांची वनडे मालिका खेळतील. अफगाणिस्तान बोर्डाच्या २०२२-२३ कालावधीसाठीच्या फ्यूचर टूर प्रोग्राममध्ये (एफटीपी) एकूण ११ वनडे, ४ टी-ट्वेन्टी आणि २ कसोटी मालिकांचा समावेश आहे. या सर्व मालिका पुढील दोन वर्षांत खेळवल्या जाणार आहेत.
भारताशिवाय अफगाणिस्तानचा संघ नेदरलँड, झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड या संघाविरुद्ध देखील खेळणार आहे. १८ लढती मायदेशात तर ३४ लढती परदेशात खेळतील. याशिवाय अफगाणिस्तानच्या वेळापत्रकात आशिया कप २०२२, टी-ट्वेन्टी वर्ल्डकप २०२२, आशिया कप २०२३ आणि वर्ल्डकप २०२३ वर्ल्डकपचा देखील समावेश आहे. मार्च महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकेत बीसीसीआय अधिकाधिक युवा खेळाडूंना संधी देऊ शकते. अशाच प्रकारचा दौरा भारताने टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या आधी श्रीलंकेविरुद्ध केला होता.