वाहन उद्योगात नव्या पर्वाची चाहूल

Share

उदय निरगुडकर : ज्येष्ठ पत्रकार

 

स्वत:ची चारचाकी हे काल उच्चमध्यवर्गीयांचं आणि श्रीमंतांचं स्वप्न असायचं, आज ते मध्यमवर्गीयांचं स्वप्न बनलं आहे. यापुढील काळात अगदी कनिष्ठ मध्यमवर्ग देखील चारचाकीचा मालक होणार, हे दिसत आहे. चारचाकीकडे अथवा दुचाकीकडे वैयक्तिक स्वातंत्र्य याच दृष्टिकोनातून पाहिलं जातं. १८८५मध्ये मुंबईत काँग्रेसची स्थापना होत होती, त्याच वेळी जर्मनीमध्ये कार्ल बेन्झ यांनी पहिली गाडी बनवली. अर्थात आता आपण वापरत असलेल्या गाड्यांपेक्षा ती पूर्णपणे भिन्न होती. तो वैयक्तिक वाहनप्रवासाच्या उत्क्रांतीचा काळ होता आणि म्हणूनच त्या काळात म्हणजे १८८६ मध्ये अमेरिकेत मिशिगनमध्ये हेन्री फोर्ड यांनीदेखील गाडी बनवली. त्याच्याच पुढे-मागे डॅम्बलर आणि मेबॅक यांनी आपल्या गाड्या बाजारात आणल्या आणि एक प्रकारे वैयक्तिक वाहतुकीच्या साधनक्षेत्रात क्रांती घडली. त्यातूनच पुढे सार्वजनिक वाहतुकीचं नवं दालनदेखील उघडलं. अनेकांना माहीत नसेल पण हे चारचाकीचं स्वप्न प्रथम पाहिलं गेलं, १४७८ मध्ये ‘द विंची कोड’ या प्रसिद्ध ग्रंथात. त्यात गाडीसदृश्य वाहनाचं चित्र रेखाटलं होतं. अर्थातच पुढे वाहनक्षेत्रात वारंवार तंत्रज्ञानबदल होत गेले; परंतु आजच्या काळात त्यात पुन्हा एकदा १८८५ सारखं नवं क्रांतिकारी पर्व सुरू होत आहे. त्याची नोंद घेण्यासाठी हा लेखप्रपंच.

१३०-१३५ वर्षांपूर्वी आपल्याकडे गाड्या आल्या आणि १६ वर्षांपूर्वी अमेरिकेच्या फोर्ड कंपनीने इलेक्ट्रिक, हायब्रीड गाड्या बाजारात आणल्या. पेट्रोलवरचं अवलंबित्व कमी व्हावं म्हणून अनेक वर्षे संशोधन करून फोर्डने बाजारात पहिल्यांदा पर्यायी इंधनाची गाडी आणली; पण बाजी मारून गेली ती टेस्ला कंपनी. ‘टेस्ला’ने निव्वळ अफलातून संशोधन केलं नाही, तर भन्नाट मार्केटिंग करत जोडीला एक उत्तम बिझनेस मॉडेल सुस्थापित करत ‘इंटर्नल कम्बशन’ या पेट्रोल आधारित तंत्रज्ञानाला पूर्ण फाटा देत इलेक्ट्रिक आणि हायब्रीड गाड्या बाजारात आणल्या. अर्थातच, परदेशात त्याची तडाखेबंद विक्री सुरू आहे.

आजचा काळ आहे इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट आणि बॅटरी या इंधनपर्यायी व्यवस्थेचा. अर्थातच यामुळे वाहनांच्या रचनेत तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल घडत आहेत. यापुढील काळात आमच्या वाहनांचं ‘दिसणं’देखील बदलणार आहे. रिचार्ज करता येणाऱ्या बॅटऱ्या आणि त्याची पुरवठा केंद्रं हा एक नवीन उपव्यवसाय सध्या वेगानं फोफावत आहे. पूर्वी जेवढ्या मोठ्या क्षमतेचं इंजिन तेवढी गाडीची प्रतिष्ठा जास्त असायची. पण आता गाडीमध्ये इंजिनच राहणार नाही. कारण पेट्रोल या इंधनाचा शक्तीमध्ये परिवर्तीत करणारा तंत्रज्ञानाचा भागच वगळला जात आहे. आता गाडीमध्ये इंजिनच नाही. मग त्या वाहनाची विश्वासार्हता, त्या कंपनीचा ब्रँड आणि मूल्य कसं ठरवणार हा देखील सवालच आहे. आजदेखील कंपन्या इंजिन आणि गाडीचा मूळ साचा आदी थोड्याफार गोष्टी बनवते आणि बाकी सर्व गोष्टी या बाजारातून बनवल्या जातात आणि त्याची वेगवान, अचूक जुळणी हे कौशल्य त्या कंपनीची स्पर्धात्मक गुणवत्ता ठरवत असते. आता जर इंजिन बनवायचेच नाही आणि बाकी सर्व भाग हे बाहेरच्या पुरवठादाराकडून मिळणार असतील, तर मग कार कंपन्या फक्त लोगो बनवणार का? असा खोचक प्रश्न विचारला जात आहे. ग्राहक मानसिकतेतला हा बदल नुसता मनोहारी नाही, तर क्रांतिकारक आहे. त्यात बाविसाव्या शतकातल्या वैयक्तिक प्रवास व्यवस्थेची बीजं रोवलेली आहेत.

हे सगळं इतक्या वेगाने चालू आहे की, ऑटोमोबाइल क्षेत्रात पूर्वीचा अनुभव उपयोगी पडेल, असं वाटत नाही. आजच अमेरिकेतल्या अनेक कार उत्पादक कंपन्यांमध्ये ऑटोमोबाइल इंजिनीअरपेक्षा सॉफ्टवेअर इंजिनीअरची संख्या जास्त आहे. हा बदल लक्षणीय आहे. आज अस्तित्वात असणारी हायब्रीड टेक्नॉलॉजीसुद्धा अल्पजीवीच आहे. फार तर दशकभर चालणारी. त्यानंतर ड्रायव्हिंग करताना आपले हात, डोळे व मन अथवा बुद्धी ड्रायव्हिंगच्या प्रक्रियेपासून विलग करून गाडी सुरळीत चालू राहील, अशा तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित होणार आहे. त्यामुळे एक संपूर्ण पिढी गाडी चालवताना स्टेअरिंग हाती का धरायचं अन् समोरच्या रस्त्याकडे टक लावून का पाहायचं, असा प्रश्न पुढच्या १० वर्षांत विचारेल.
मेट्रो शहरातली जीवनशैली दिवसेंदिवस खर्चिक बनत आहे. त्यामुळे जवळपासच्या उपनगरातून स्वत:च्या गाडीने येणं, ही चैन नाही तर गरज आहे आणि हाच प्रकार पुढच्या दशकात स्वस्त आणि सुरक्षित होणार आहे. आता तुमच्याकडे वाहन सौख्य असेल, पण स्वत:चं वाहन असणार नाही. त्याची तशी गरजही नाही. आज हे स्वप्नरंजन वाटेल. पण पाच वर्षांपूर्वी रोज रात्री कधी इटालियन पिझ्झा, कधी थाई ग्रीन करी, कधी जॅपनीज सुशी, कधी पावभाजी, तर कधी पिठलं-भाकरी हे सगळं तुम्हाला किचनमध्ये न जाता घरबसल्या केवळ एका फोनवर मिळणार आहे, असं सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवला असता का? आज झोमॅटो आणि स्विगी हे स्वप्न लीलया तडीस नेत आहेत. हे आमची बदलती मानसिकता दर्शवत आहेत. जे ‘फूड मार्केट’मध्ये घडलं तेच उद्या चारचाकी गाड्यांच्या मार्केटमध्ये घडणार. त्या गाड्या भलत्याच्याच मालकीच्या असतील. इलेक्ट्रिक अथवा हायड्रोजनवर चालणाऱ्या असतील. भले त्याचा मालकी हक्क तुमच्याकडे नसेल, पण त्याच्या वापराचे अधिकार तुम्हाला मिळू शकतात. आहे की नाही भन्नाट भविष्य? तेच आज दाराशी आलं आहे.

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

6 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

26 minutes ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

57 minutes ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

1 hour ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago

Emraan Hashmi: इमरान हाश्मीच्या नव्या चित्रपटावर भाजपा आणि काँग्रेस खासदारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया!

मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…

2 hours ago