Monday, August 25, 2025

कर्मचारी अंगावर आले तर काय कराल?

कर्मचारी अंगावर आले तर काय कराल?

नाशिक (प्रतिनिधी): एसटी कर्मचाऱ्यांना चार महिने पगार नाही. लोकांसाठी राज्य असते. अरेरावीची, कायद्याची भाषा बोलू नये. एक लाख जण अंगावर आले तर काय कराल, असा प्रश्न करतानाच एसटी संपाबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिकृत बोलावे, असा सल्ला राज ठाकरे यांचा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या ठाकरे यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला.

चार-चार महिने पगाराशिवाय राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मासारखी अरेरावाची भाषा योग्य नाही. जोपर्यंत एसटीतला भ्रष्टाचार बंद होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अधिकृत बोलावे. एसटीच्या संपाची माहिती घेतली आहे. एसटी कर्मचारी यावेळी युनियन सोडून एकत्र आले आहेत. लोकांसाठी राज्य असते. त्यांच्याशी अरेरावीची, कायद्याची भाषा बोलू नये. हे योग्य नाही. कर्मचाऱ्यांच्या मागण्या, प्रश्न समजावून घ्या, असे आवाहन करत खासगीकरण करण्याऐवजी एखादी मॅनेजमेंट कंपनी काढा. इकडे मात्र, तुम्ही एकही पाऊल उचल नाही. त्यांना वाऱ्यावर सोडून देऊन अरेरावाची भाषा करणे योग्य नाही. एक लाख कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल, अशी थेट विचारणा राज ठाकरे यांनी यावेळी केली.

कोरोना नियमांबाबत सरकारमधील लोकांनाच नीट समजत नाही. कोरोना नियमांमध्ये एकाला सूट आणि दुसऱ्याला नाही, असे सुरू आहे. थिएटरमध्ये मास्क लावायचा नाही. एक खुर्ची मोकळी सोडायची. मग हेच नियम रेस्टॉरंटला लागू नाहीत, असा टोला लगावत राज ठाकरे यांनी आचारसंहितेच्या नियम पालनाचा किस्सा सांगितला. १९९५ मध्ये निवडणूक आचारसंहिता आणली. तिचे नियमही लोकांना स्पष्ट माहिती नव्हते. त्यामुळे एक कॅमेरावाला माझ्या मागे लागला. तेव्हा त्याला बाथरूमला चाललोय हे सांगावे लागले, असे सांगितल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Comments
Add Comment