
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): धर्माच्या आधारावर भारताची फाळणी करणं, ही ऐतिहासिक चूक होती, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. सशस्त्र दलांच्या योगदानाचे स्मरण करणार्या ‘स्वर्णिम विजय पर्व’च्या उद्घाटनावेळी रक्षा मंत्री सिंह यांनी हे वक्तव्य केले.
१९७१मधील युद्ध आपल्याला हेच सांगते की धर्माच्या आधारावर भारताची फाळणी ही ऐतिहासिक चूक होती.
पाकिस्तानचा जन्म एका धर्माच्या नावावर झाला पण तो एकच राहू शकला नाही. या युद्धातील पराभवानंतर, पाकिस्तान सतत छुपं युद्ध लढत आहे. पाकिस्तानला दहशतवाद आणि इतर भारतविरोधी कारवायांना प्रोत्साहन देऊन भारतातील शांतता बिघडवायची आहे. भारतीय सैन्याने १९७१ मध्ये त्यांच्या भारताविरोधातील कारवाया हाणून पाडल्या होत्या आणि दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी काम केले होते. तेव्हापासून अजूनही भारत पाकिस्तानच्या कुरापती रोखण्यासाठी काम करत आहे. तेव्हा झालेल्या प्रत्यक्ष युद्धात आमचा विजय झाला होता आणि या अप्रत्यक्ष युद्धातही विजय आमचाच असेल,” असेही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.
१९७१ च्या युद्धाचे स्मरण करून राजनाथ सिंह म्हणाले की, आमच्या सशस्त्र दलांनी ‘मुक्तिवाहिनी’ला पाठिंबा दिला, लाखो निर्वासितांना मदत केली. तसेच पश्चिम आणि उत्तरेकडील सर्व प्रकारचे आक्रमण रोखले. त्यांनी शांतता, न्याय आणि मानवतेसाठी भारताच्या वचनबद्धतेची विश्वासार्हता सुनिश्चित केली. इतिहासात हे क्वचितच पाहायला मिळंत की एखाद्या देशाला युद्धात पराभूत केल्यानंतर, दुसरा देश आपले वर्चस्व लादत नाही, तर आपल्या राजकीय प्रतिनिधीकडे सत्ता सोपवतो. भारताने हे केले कारण तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे.