अमरावती (हिं.स) : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर कॉंग्रेसचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांनी सोमवारी मुख्यमंत्री सचिवालयात राज्याच्या कोरोना विरुद्ध सुरु अभियानाचा आढावा घेतला. (Jagan Mohan Reddy holds Corona Review Meeting)
यावेळी कोरोना निवारण, उपचार, कोरोना प्रबंधन, दैनंदिन लसीकरण, कोरोना प्रतिबंध, ओमायक्रॉन प्रकार तसेच नाडू-नेडू सारख्या विषयांवर चर्चा आणि मंथन झाले. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी यावेळी आवश्यक माहिती जाणून घेतली तसेच संबंधित मंत्रालय आणि अधिका-यांना-प्रशासनास दिशानिर्देश दिले.
रविवारी आंध्रप्रदेशमध्ये कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराचा शिरकाव झाला. आयर्लंड देशातून परत आलेल्या एका ३४ वर्षाच्या नागरिकास ओमायक्रॉनचा संसर्ग झाला असून राज्यातील हा ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आहे. बाधित नागरिकांना कोणतेच लक्षणं नसून ते सध्या देखरेखीत आहे.
राज्य शासन आणि प्रशासनाने नागरिकांना कोरोना नियमांचे योग्य पालन करण्याचे तसेच लसीकरण पूर्ण करून घेण्याचे आवाहन केले आहे. तिरुपती येथे ओमायक्रॉनचा कुठलाच रुग्ण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून अफवा आणि खोट्या वार्ता प्रसारित करण्यापासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तसे केल्यास संबंधित दोषीस कारवाईस सामोरे जावे लागेल, अशी ताकीद दिली आहे.