Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीपंतप्रधान मोदींच्या हस्ते श्री काशी विश्वनाथ धामचे भव्य लोकार्पण

पंतप्रधान मोदींच्या हस्ते श्री काशी विश्वनाथ धामचे भव्य लोकार्पण

पंतप्रधानांचे पवित्र गंगेत स्नान; ‘मोदी मोदी’, ‘हरहर महादेव’च्या घोषणांनी निनादला गंगा घाट

वाराणसी (वृत्तसंस्था): श्री काशी विश्वनाथ धाम हे आपल्या भारतीय परंपरा, आध्यात्मिकता आणि सनातन संस्कृतीचं प्रतिक आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच भारताची प्राचीनता आणि नवीनता या दोन्ही इथे एकत्रितपणे जिवंत होताना दिसतात. इथल्या जुन्या परंपरा भविष्याला दिशा देतात, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धामाचे (कॉरिडॉर) ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व वर्णन विषद केले.

पंतप्रधानांच्या हस्ते सोमवारी काशी विश्वनाथ धामाचे भव्य लोकार्पण झाले. काशी विश्वनाथ धाम हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. काशी विश्वनाथ धाम प्रकल्पाच्या फेज १ या पहिल्या टप्प्याची किंमत साधारण ३३९ कोटी इतकी आहे. हा प्रकल्प काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगेचा वाराणसीमधला किनारी प्रदेश यांना जोडणारा आहे.

अनंत ऊर्जेने भारलेले विश्वनाथ धाम

काशी विश्वनाथ धाम अकल्पित ऊर्जेने भारले आहे. आज इथल्या वैभवात आणखी विस्तार होतोय. हा नवा परिसर म्हणजे आपली भारतीय संस्कृती, आध्यात्मिकता आणि भारतीय सनातन संस्कृतीचं प्रतिक आहे. भारतीय परंपरा, ऊर्जा, गतीशीलता इथं दिसून येते. इथे केवळ श्रद्धेचंच दर्शन घडतं असं नाही तर भारताच्या गौरवशाली इतिहासाची अनुभूती इथे मिळते. प्राचीनता आणि नावीन्यते इथे एकत्रितपणे जिवंत होतात. इथल्या पुरातन प्रेरणा भविष्याला दिशा देतात, असे मोदी म्हणाले.

महादेवाच्या चरणी लीन झालेल्या गंगेचा इथे दैवी अनुभव

काशी विश्वनाथ येथील गंगा आपला प्रवाह बदलत उत्तरवाहिनी होऊन महादेवाच्या दर्शनासाठी येते. ती गंगा आज खूप प्रस्नन असेल. आपण विश्वनाथाच्या चरणी नमन करतो तेव्हा गंगेला स्पर्श करत येणारी हवा आपल्याला आशीर्वाद देते. महादेवाच्या चरणी ध्यान लावताना गंगेवरच्या लहरी आपल्याला दैवी आनंद देतात. गंगेत खूप शक्ती आहे. आजचं हे कार्य म्हणजे गंगेचा आशीर्वाद आहे, असे मोदी म्हणाले.

भोलेनाथाच्या चरणी लीन

काशीमध्ये फक्त एकच सरकार आहे. ज्यांच्या हातात डमरू आहे…,असे म्हणत मोदी यांनी भोलेनाथाच्या चरणी मस्तक टेकवले आणि यावेळी देशाच्या विकासासाठी जनता जनार्दनाला साकडे घालत तीन संकल्पाची मागणी केली. ज्या कामगारांनी आपला घाम गाळून काशीमध्ये हा भव्य परिसर तयार केला, त्यांचे आभार यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मानले. कोरोनाच्या बिकट काळातही त्यांनी काम थांबवले नाही. मला या श्रमिकांना भेटण्याचे, त्यांचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले. काशी तो काशी है! काशी तो अविनाशी है. काशी में एक ही सरकार है, जिनके हाथों में डमरू है, उनकी सरकार है, असे म्हणत पंतप्रधान एकदम तल्लीन झाले.

काशीला कोण रोखणार…?

जिथे गंगा आपली धारा बदलून वाहते. त्या काशीला कोण रोखू शकते, असा प्रश्नही मोदी यांनी यावेळी केला. काशी ही चार जैन तीर्थंकरांची भूमी आहे. अहिंसा आणि तपस्याचे प्रतीक आहे. राजा हरिश्चंद्राच्या सचोटीपासून वल्लभाचार्य, रामानंद जी यांच्या ज्ञानापर्यंत तर चैतन्य महाप्रभू, समर्थ गुरु रामदास ते स्वामी विवेकानंद, मदन मोहन मालवीय अशा कित्येकांचा या भूमीशी संबंध आहे. किती ऋषी आणि आचार्यांचा संबंध आहे, असे उद्गार मोदी यांनी यावेळी काढले.

जनता जनार्दन ईश्वराचे रूप

पंतप्रधान मोदींनी जनतेला ईश्वर (भगवान) म्हणताना त्यांच्याकडून तीन गोष्टी मागितल्या. ते म्हणाले, गुलामीच्या मोठ्या कालखंडाने भारतीयांचा आत्मविश्वास चक्काचूर केला. त्यामुळे आपण आपल्याच सृजनावरील विश्वास गमावून बसलो. आज हजारो वर्ष जुन्या या काशीतून मी देशवासीयांना आवाहन करतो की, त्यांनी पूर्ण आत्मविश्वासाने सृजनाची कास धरावी. नवनिर्मिती करा. इनोव्हेटिव्ह पद्धतीने काही करा. माझ्यासाठी जनता जनार्दन ईश्वराचे रूप असल्याचे ते म्हणाले.

मोदींचे तीन संकल्प

प्रत्येक भारतीयांमध्ये परमेश्वराचा अंश आहे. त्यामुळे मी तुम्हाला काही मागू इच्छितो. हे माझ्यासाठी नाही, तर आपल्या देशासाठी तीन संकल्प करा. स्वच्छता, सृजन आणि आत्मनिर्भर भारतासाठी सततचे प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मोदी पुढे म्हणाले की, तिसऱ्या संकल्पाची आत्ताच सुरुवात करावी लागेल. हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे. आपल्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली. जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील. तेव्हा मोठा सोहळा होईल. त्यावेळी भारत कसा असेल, त्यासाठी आत्तापासून काम करावे लागेल, असे आवाहन मोदींनी केले.

भारताची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शूर योद्ध्यांची

काश्मीवर अनेक हल्ले झाले. सांस्कृतिक अतिक्रमणही करण्यात आले. मंदिरांचे नुकसान करण्यात आले. त्याच्या दहशतीचा इतिहास साक्षीदार आहे. त्याने भारतीय संस्कृती आपल्या तलवारीच्या बळावर बदलण्याचा प्रयत्न केला. कट्टरतेने संस्कृती चिरडण्याचा प्रयत्न केला. पण या देशाची माती जगापेक्षा वेगळी आहे. याच महान भूमित छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूर आणि पराक्रमी राजे निर्माण झाले. औरंगजेबासारख्यांचे मनसुबे त्यांनी उधळून लावले. ही आपली शूरांची भूमी आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधानांचे पवित्र गंगेत स्नान; ‘मोदी मोदी’, ‘हरहर महादेव’च्या घोषणांनी निनादला गंगा घाट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कालभैरव मंदिरात पूजाअर्चा केली. त्यासोबतच पवित्र गंगा नदीत स्नानही केले. या पवित्र मानल्या जाणाऱ्या शहरातल्या काही स्थानिकांची भेट घेत मोदींनी त्यांच्या स्वागत-सत्काराचा लाभ घेतला. या भागातील रहिवाशांनी पंतप्रधान मोदींवर पुष्पवृष्टी केली. यावेळी हा संपूर्ण परिसर मोदी मोदी आणि हर हर महादेवच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. त्यानंतर पंतप्रधानांनी खिरकिया घाट ते ललिता घाट हा बोट प्रवास करत काशी विश्वनाथ मंदिर भेटीसाठी प्रयाण केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -