डोंबिवली (वार्ताहर) : गुन्ह्यातील आरोपीला कोरोनाची लागण झाल्याने त्याच्यावर कल्याण येथील टाटा आमंत्रण येथे उपचार सुरू होते. १० मे रोजी या आरोपीने संधीचा फायदा घेत तेथून पळ काढला. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत होते. सात महिन्यानंतर या आरोपीला पोलिसांनी दादरा नगर हवेली येथून अटक करून बेड्या ठोकल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार कृष्णा बिंद ( ३० वर्षे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक आरोपीवर मानपाडा पोलीस ठाण्यात २०६/२०२१ भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. राजकुमार याला पोलिसांनी डोंबिवलीत अटक केली तेव्हा त्याला करोनाची लागण झाली होती.
भिवंडी येथील कोनगाव पोलीस ठाणे येथे त्याच्यावर गु. रं. नं. १२७/ २०२१ भादवि कलम २२४, १८८, २६९, २७०, महाराष्ट्र कोव्हीड १९ विनीमयन २०२० चे कलम ११, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ (ब), साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम २, ३, ४ प्रमाणे दाखल करण्यात आला. राजकुमार याचा मानपाडा पोलीस व कोनगांव पोलीस शोध घेत होते.
१३ डिसेंबर रोजी पोलिसांनी दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी असलेल्या सिल्वासा शहरामधुन अटक केली आहे.