Sunday, May 25, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीय

मध्यरात्री दीड वाजता परिक्षा रद्द का करावी लागली?

मध्यरात्री दीड वाजता परिक्षा रद्द का करावी लागली?

मुंबई : म्हाडाकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी आयोजित केलेली परीक्षा अचानक रद्द करण्यात आली असल्याने परीक्षार्थींमध्ये संताप आहे. काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा सांगितले. ट्विटरला व्हिडीओ शेअर करत त्यांनी ही माहिती दिली. परीक्षार्थींना होणाऱ्या त्रासाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी क्षमा मागितली आहे. दरम्यान परीक्षा रद्द करण्यात आल्याने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनीदेखील संताप व्यक्त केला आहे.


“प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण खात्याचा दर आठवड्याला एक्सेल शीटमध्ये न चुकता हिशोब घेतात. पण बहुजन पोरांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडा नोकरभरतीबाबत लक्ष द्यायला वेळ नाही. आठवड्याभरापासून म्हाडाच्या नोकर भरती परिक्षांमध्ये घोटाळा होणार असे स्वत:च सांगत त्यात बळी पडू नये म्हणून प्रसारमाध्यमांमध्ये आवाहन करत होते. जर त्यांना घोटाळ्याची पूर्वकल्पना होती आणि गृहखातेही राष्ट्रवादीकडे असतानासुद्धा त्यांना मध्यरात्री दीड वाजता परिक्षा रद्द का करावी लागली?,” असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी विचारला आहे.


‘महाराष्ट्रातील प्रस्थापितांच्या सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यातच रस आहे. एक एक पैसा गोळा करून परिक्षेसाठी पोहचलेल्या बहुजन पोरांविषयी, नोकरीअभावी आत्महत्या करणाऱ्या बहुजन पोरांविषयी यांना काहीही देणेघेणे नाही,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.


रात्री उशिरा जितेंद्र आव्हाड यांनी ट्रविटरवर तसेच म्हाडाच्या वेबसाईटवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून ही परीक्षा आता पुढील वर्षी होणार आहे, अशी माहिती दिली.


“सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे उद्याची होणारी म्हाडाची परीक्षा आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून जानेवारीत घेतल्या जातील. विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी घराबाहेर पडून केंद्रावर जाऊ नये यासाठी इतक्या रात्री ही माहिती देत आहे,” असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.


या परीक्षेसाठी पश्चिम महाराष्ट्रातून कालच हजारो विद्यार्थी मुंबई, पुणे, बारामती आदी विविध केंद्रात पोहचले आहेत. आता त्यांना मध्यरात्रीच्या घोषणेमुळे निष्कारण त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही घोषणा आधीच किमान कालपर्यंत केली असती तर नाहक धावपळ, त्रास वाचला असता असा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेतील गोंधळाची परंपरा आजही कायम राहिली आहे.

Comments
Add Comment