चंदीगड/ अमरावती : देशात कोरोनाचा नवीन वेरियंट ओमायक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. आता आणखी दोन राज्यांमध्ये कोरोना ओमायक्रॉन व्हेरियंटचे दोन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर कर्नाटकमध्ये आणखी एक नवीन रुग्ण आढळला आहे. यामुळे देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही वाढून ३६ वर गेली आहे.
चंदीगडमध्ये एका २० वर्षांच्या तरुणाला ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हा तरुण २२ नोव्हेंबरला इटलीतून भारतात आला होता. १ डिसेंबरला त्यांची टेस्ट करण्यात आली होती. त्याला ओमायक्रॉनचे संसर्ग झाल्याचे समोर आले. त्याने कोरोनावरील फायजर लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्याची आज पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट यायचा बाकी आहे, अशी माहिती चंदीगडच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचा आणखी एक नवीन रुग्ण आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेली एक ३४ वर्षीय व्यक्ती ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आली आहे. या व्यक्तिला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्या जवळच्या संपर्कातील ५ जण आणि या ५ जणांच्या संपर्कातील १५ जणांचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर के यांनी दिली.
आंध्र प्रदेशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण
एक ३४ वर्षीय व्यक्ती आयर्लंडमधून भारतात आली. ही व्यक्ती मुंबई विमानतळावर उतरली आणि त्यावेळी या व्यक्तीची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. पण आरटी-पीसीआर चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. यानंतर त्याला पुढील प्रवासाला जाण्यासाठी परवानगी देण्यात आली. ही व्यक्ती गेल्या महिन्यात २७ नोव्हेंबरला विशाखापट्टणममध्ये आली. यावेळी विशाखापट्टणममध्ये या व्यक्तीची पुन्हा आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. या चाचणीत ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. यानंतर त्याचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी हैदराबाद येथे पाठवण्यात आले. त्याचा रिपोर्ट आता ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यात कुठलीही लक्षणे दिसून आली नाहीत. त्याची शनिवारी म्हणजे ११ डिसेंबरला पुन्हा आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली. आता त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सध्या राज्यात ओमायक्रॉनचा दुसरा कुठलाही रुग्ण नसल्याचे आंध्र प्रदेश सरकारने म्हटले आहे. आंध्र सरकारच्या आरोग्य विभागाने या संबंधी पत्रक जारी करून माहिती दिली आहे.
आंध्र प्रदेशात ओमायक्रॉनचा हा पहिला रुग्ण होता. आतापर्यंत विदेशातून आलेल्यांपैकी १५ जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी हैदराबादला पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी १० जणांचे रिपोर्ट आले होते. त्यात एकाचा रिपोर्ट हा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला होता. पण नागरिकांनी यामुळे घाबरून जाऊ नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. कोरोनासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना पाळा. सोशल डिस्टन्सिंग ठेवा, मास्क लावा आणि हात धुवा, असे आवाहन सरकारच्या आरोग्य विभागाने केले आहे.