डोंबिवली : कोरोना काळात सर्वात जास्त आर्थिक घोटाळा करण्यात मुंबई महानगरपालिकेचा वरचा नंबर आहे. या काळात भारतात सर्वात जास्त कोरोना मृत्यूची संख्या आहे. मात्र हे ठाकरे सरकारने जनतेपासून लपवले आहे. याला हे सरकार जबाबदार असून या घोटाळ्यात मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी सामील असतील तर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली पाहिजे. यावर मंगळवारी मी स्वतः मुंबई महानगरपालिकेत जाऊन याचा जाब विचारणार आहे. यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा नंबर आहे, असा स्पष्ट इशारा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी डोंबिवलीत दिला.
सोमय्या रविवारी सायंकाळी डोंबिवलीतील ठाकूर सभागृहात कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सोमय्या यांनी थेट महाविकास आघाडी सरकारवर निशाण साधला. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, मंत्री अनिल परब यांनी केलेल्या घोटाळ्यावर थेट आरोप करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसवा शरद पवार यांचा याला आशीर्वाद असून हे ठाकरे सरकार जनतेला लुटत असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. नवाब मलिक यांच्यावरही निशाणा साधत `हर्बल गांजा` कोणता असतो असे हसत सांगत त्यांची टिंगल केली.
कोरोना काळात मोदी सरकार महाराष्ट्राला मोफत लस देणार होते, मात्र मुंबई महापालिकेच्या महापौरांनी आम्हाला तुमची लस नको, आम्ही तीन महिन्यात मुंबईतील सर्व जनतेला लस देऊ असे बोलल्या होत्या. पुढे काय झाले ते सर्वाना माहित आहे, अजूनही मुंबईतील ती लस जनतेपर्यत पोहोचलीच नाही. कोरोना काळात मुंबई महापालिकेत खूप आर्थिक घोटाळा झाला आहे. म्हणूनच मी स्वतः पालिकेत जाऊन याचा जाब विचारणार आहे. येथील अधिकाऱ्यांनाहि सोडणार नाही. नंतर दुसरा नंबर कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेचा आहे. महाराष्ट्राला लुटण्याची स्पर्धा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी किरीट सोमय्या यांचे ”महावसुली सरकारचे हे घोटाळे” हे पुस्तक कार्यकर्त्याना देण्यात आले. कार्यकर्ता मेळाव्यात आमदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब, माजी नगरसेवक मंदार हळबे यांसह महिला पदाधिकारी सुहासिनी राणे, पूनम पाटील आदि उपस्थित होते.