Wednesday, April 30, 2025

क्रीडा

बवणेच्या शतकामुळे महाराष्ट्र पुन्हा विजयीपथावर

बवणेच्या शतकामुळे महाराष्ट्र पुन्हा विजयीपथावर

राजकोट (वृत्तसंस्था) : गटवार साखळीत चौथ्या सामन्यात उत्तराखंडवर ४ विकेट आणि एक चेंडू राखून विजय हजारे चषक एलिट गटात (ड गट) महाराष्ट्र पुन्हा विजयीपथावर परतला आहे. आघाडी फळीतील अंकित बवणेचे (नाबाद ११३) नाबाद शतक त्यांच्या तिसऱ्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

रंगतदार लढतीत सोमवारी उत्तराखंडचे २५२ धावांचे विजयी लक्ष्य ४९.५ षटकांत ६ विकेटच्या बदल्यात पार केले. कर्णधार ऋतुराज गायकवाडसह अन्य सलामीवीर यश नहर आणि वनडाऊन राहुल त्रिपाठीला (प्रत्येकी २१ धावा) मोठी खेळी करण्यात अपयश आले. मात्र, अंकितने एक बाजू कायम ठेवली. त्याला मधल्या फळीतील नौशाद शेखची (४७ धावा) चांगली साथ लाभली. त्यामुळे बवणेने प्रतिस्पर्ध्यांच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला. अंकितने १३२ चेंडूंत ११३ धावांची नाबाद खेळी केली. त्यात डझनभर चौकार आणि एका उत्तुंग षटकाराचा समावेश आहे. उत्तराखंडकडून स्वप्नील सिंग आणि हिमांशू बिश्तने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तरी अंकितच्या खेळीने त्यांच्या विजयाच्या आशेवर पाणी फेरले.

त्यापूर्वी, उत्तराखंडने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २५१ धावा केल्या. सलामीवीर तनुश गुसेन (८८ चेंडूंत ५५ धावा), मधल्या फळीतील अष्टपैलू स्वप्नील सिंग (६६ चेंडूंत तितक्याच धावा) तसेच वैभव पाटीलमुळे (४७ चेंडूंत ४१ धावा) त्यांनी अडीचशेपार मजल मारली. महाराष्ट्राकडून मुकेश चौधरीसह जगदीश झोपेने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

महाराष्ट्राचा चार सामन्यांतील हा तिसरा विजय आहे. त्यांच्या खात्यात आता १२ गुण झालेत. ते गुणतालिकेत आता तिसऱ्या स्थानी आहेत. उत्तराखंडचा चार सामन्यांतील हा तिसरा पराभव आहे.

मुंबईसह विदर्भ बॅकफुटवर

महाराष्ट्र विजयीमार्गावर परतला तरी गतविजेता मुंबईसह विदर्भ पिछाडीवर पडला आहे. मुंबईला बंगालकडून मात ६७ धावांनी मात खावी लागली. दुसरीकडे, विदर्भचा गुजरातकडून ४६ धावांनी पराभव झाला.

‘ब’ गटात बंगालचे ३१९ धावांचे आव्हान मुंबईला पेलवले नाही. गतविजेत्यांची मजल ८ बाद २२३ धावांपर्यंत गेली. त्यांचा एकही फलंदाज पन्नाशी पार करू शकला नाही. सर्वाधिक ४९ धावांचे योगदान कर्णधार सूर्यकुमार यादवचे राहिले. त्यानंतर अरमान जाफरने सर्वाधिक ४७ धावा केल्या. बंगालच्या प्रदीप्त प्रामाणिकने अचूक मारा करत तीन विकेट घेत मुंबईच्या फलंदाजांना वेसण घातली. त्यापूर्वी, तिसऱ्या क्रमांकावरील अनुस्तुप मजुमदार (१२२ चेंडूंत ११० धावा) आणि पाचव्या क्रमांकावरील शाहबाझ अहमदच्या (९७ चेंडूंत १०६ धावा) फटकेबाजीमुळे बंगालने तीनशेपार मजल मारली.

गुजरातचे ३६४ धावांचे लक्ष्य गाठताना विदर्भचा डाव ४८.३ षटकांत ३१७ धावांवर आटोपला. वनडाऊन गणेश सतीशसह (७८ चेंडूंत ११० धावा) मधल्या फळीतील आदित्य सरवटेमुळे (३८ चेंडूंत ५८ धावा) विदर्भने विजयासाठी निकराचे प्रयत्न केले तरी अन्य फलंदाजांनी निराशा केली. चिंतन गजा आणि सिद्धार्थ देसाईने (प्रत्येकी ३ विकेट) प्रभावी मारा करताना विजयात मोलाचे योगदान दिले. तत्पूर्वी, सलामीवीर सौरव चौहान (१२१ चेंडूंत १४१ धावा) आणि कर्णधार हेत पटेलच्या (८७ चेंडूंत १०९ धावा) दमदार फलंदाजीच्या बळावर गुजरातने ६ बाद २६३ अशी मोठी धावसंख्या उभारली.

नन्नाचा पाढा कायम असल्यामुळे ४ सामन्यांतून ४ गुणांमुळे ‘ब’ मुंबई संघ तळात (सहावे स्थान) फेकला गेला आहे. विदर्भचे ४ सामन्यांतून ८ गुण झाले असून ‘अ’ गटात ते चौथ्या स्थानी आहेत.

Comments
Add Comment