Thursday, July 18, 2024
Homeमहत्वाची बातमीडिपॉझिट इन्शुरन्स योजनेचा गरीब, मध्यमवर्गीयांना फायदा : गडकरी

डिपॉझिट इन्शुरन्स योजनेचा गरीब, मध्यमवर्गीयांना फायदा : गडकरी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने आणलेल्या डिपॉझिट इन्शुरन्स योजनेचा फायदा देशातील गरीब, मध्यमवर्गीय आणि लहान गुंतवणूक करणार्या बँकेच्या ग्राहकांनाच होईल. छोट्या गुंतवणूकदारांच्या हिताचा या योजनेत विचार करण्यात आला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

मुंबईतील वांद्रे येथे बँक ऑफ इंडियाच्या सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. डिपॉझिट इन्शुरन्स प्रोग्राम या योजनेचा आज, रविवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होत आहे. याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले की, बँकेचे ग्राहक चांगल्या बँकांकडे आपली रक्कम डिपॉझिट करतात. निवृत्तीनंतर या गुंतवणुकीच्या व्याजावर आपला उदरनिर्वाह करावा असे त्यांना वाटते. पण काही कारणांमुळे बँक संकटात आली, तर गुंतवणूकदार अडचणीत येतात. या अडचणीचा सामना गुंतवणूकदारांना करावा लागू नये म्हणून गुंतवणुकीला या सरकारने विमा कवच प्रदान केले. आतापर्यंत 1 लाख रुपयांचे विमा कवच पंतप्रधान मोदी यांनी आता 5 लाख रुपयांपर्यंत केले आहे. या योजनेचा फायदा गरीब, मध्यमवर्गीय व छोट्या गुंतवणुकी करणा-या बँकांच्या ग्राहकांना होणार असल्याचेही गडकरी म्हणाले.

बँकांमध्ये गुंतवणूक करणा-या ग्राहकांच्या रकमेचे रक्षण करणे हीच शासनाची भूमिका आहे, असे सांगताना गडकरी म्हणाले की, २१व्या शतकात सर्वात मोठे भांडवल हे विश्वसनीयता राहणार आहे. जास्त व्याज मिळेल तेथे लोकांनी जाणे हे चूक नाही. पण बँकेवर संकट आले गुंतवणुकीची रक्कम मिळणे अडचणीचे होते. बँकांमधील गुंतवणुकीवर नवीन विमा कवच योजनेमुळे सर्वच बँकेच्या गुंतवणूक करणा-या ग्राहकांना न्याय मिळणार आहे. डिपॉझिट कोणत्याही बँकेत असो, गुंतवणूकदारांना विमा कवच मिळणार आहे. तसेच या विमा कवचासाठी प्रिमियम ग्राहकांना भरावे लागणार नाही तर बँकच हे प्रिमियम भरणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना आपल्या भाषणातून धन्यवाद दिले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -