मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच जारी केलेल्या अर्थविषयक धोरणात रेपो दरांमध्ये कोणताही बदल करण्यात न आल्यामुळे मालमत्ता क्षेत्रात उत्साहाचे वातावरण असून गृहकर्जावरील व्याजदरांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गृहकर्जावरील व्याजदर कमी असल्यामुळे घर खरेदीसाठी सध्याचा काळ उत्तम मानला जात आहे. त्यातच रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे घरांच्या मागणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाबाबत क्रेडाईचे अध्यक्ष हर्षवर्धन पटोदिया यांनी आनंद व्यक्त केला असून रेपो तसंच रिव्हर्स रेपो दरांमध्ये वाढ न करण्याचा निर्णय अत्यंत क्रांतीकारी आणि देशाला प्रगतीकडे नेणारा असून यातून रिझर्व्ह बँकेची उदारमतवादी वृत्ती दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यातही संपूर्ण उद्योगक्षेत्रावर ओमायक्रॉनचे सावट असताना रिझर्व्ह बँकेने घेतलेला हा निर्णय मालमत्ता उद्योगाला नवी दिशा देणारा असल्याचेही त्यांनी सांगितले. ते पुढे सांगतात, गृह कर्जावरील व्याजाचे दर कमी राहिल्यामुळे मालमत्ता खरेदीदारांमध्ये विश्वास निर्माण होऊन देशाच्या अर्थव्यवस्था वाढीलाही वेग येईल. मालमत्ता क्षेत्रातले एक तज्ज्ञ निरंजन हिरानंदानी यांनीही रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले. गृहकर्जावरील कमी व्याजदरांचा लाभ घेण्यास नक्कीच उत्सुक असतील, असे ते सांगतात.
इंडिया सूथबी इंटरनॅशनल रिऍल्टीचे सीईओ अमित गोयल म्हणतात, गृहकर्जावरील व्याजदर सात टक्क्यांवर स्थिर असून यामुळे निवासी मालमत्तेच्या मागणीत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. आता सगळ्यांच्या नजरा राष्ट्रीय अर्थसंकल्पाकडे लागून राहिल्या आहेत. अर्थसंकल्पात गृहकर्जावर अधिक कपात करण्याचा निर्णय झाल्यास भारतीय मालमत्ता उद्योगाला नवी दिशा मिळू शकते. ‘नारेडको महाराष्ट्र’चे अध्यक्ष संदीप रनवाल यांच्या म्हणण्यानुसार या वर्षाच्या अखेरीपर्यंत गृहकर्जावरील व्याजदर अत्यल्प राहतील. यामुळे मालमत्ता उद्योग आणि अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल.