नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने, ९० दिवस म्हणजेच तीन महिन्यांत ठेवीदारांना त्यांची रक्कम परत देणे अनिवार्य केले आहे. म्हणजे बँक बुडाली, तरी ठेवीदारांना त्यांची रक्कम आता ३ महिन्यांत परत मिळणार, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील ठेवीदारांना आश्वस्त केले आहे.
नवी दिल्लीत सोमवारी झालेल्या, ‘ठेवीदार प्रथम : पाच लाख रुपयांपर्यंतच्या रकमेची हमीपात्र कालबद्ध ठेवी विमा परतावा योजना’ या कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. केंद्रीय अर्थमंत्री, अर्थराज्यमंत्री, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते काही धनादेश, ठेवीदारांना परत करण्यात आले. भारतात, बँक ठेवीदारांसाठी विमा सुरक्षा व्यवस्था साठीच्या दशकातच अस्तित्वात आली होती. मात्र, आधी बँकेत ठेवलेल्या एकूण ठेवीच्या रकमेपैकी केवळ, ५० हजार रुपये परत मिळण्याचीच हमी दिली जात असे. त्यानंतर, ही मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. म्हणजेच, बँक बुडली, तर ठेवीदारांना त्यांची केवळ एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळत असे, आता मात्र, गरिबांच्या, मध्यमवर्गीयांच्या समस्या लक्षात घेत आम्ही बुडालेल्या ठेवी परत मिळण्याच्या हमीची व्याप्ती वाढवत, ती पाच लाख रुपये इतकी केली आहे. दुसरी समस्या कायद्यात दुरुस्ती करून सोडवण्यात आली आहे. पूर्वी, पैसा कधी मिळेल, याची काहीही कालमर्यादा नव्हती. आता मात्र, आमच्या सरकारने, ९० दिवसांत, म्हणजेच तीन महिन्यांत ठेवीदारांना त्यांची रक्कम परत देणे अनिवार्य केले आहे. म्हणजे, जरी बँक बुडाली, तरीही, ठेवीदारांना त्यांची रक्कम आता ३ महिन्यांत परत मिळणार आहे, असे मोदी यांनी सांगितले.
सोमवारचा दिवस बँकिंग क्षेत्र आणि कोट्यवधी बँक खातेधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण गेली कित्येक दशके भिजत घोंगडे म्हणून पडून राहिलेला हा प्रश्न सोडवला गेल्याचे त्यांना बघायला मिळत आहे. ‘ठेवीदार प्रथम’ या घोषणेमागचा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे, यावर त्यांनी भर दिला. गेल्या काही दिवसांत एक लाखापेक्षा अधिक ठेवीदारांना त्यांच्या कित्येक वर्षे बँकेत अडकलेल्या ठेवी परत मिळाल्या. ही एकूण रक्कम १३०० कोटींपेक्षा अधिक होती, असे पंतप्रधानांनी सांगितले.
देशाच्या समृद्धीत बँकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आणि म्हणूनच बँकांच्या समृद्धीसाठी ठेवीदारांचा पैसा सुरक्षित राहणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. बँका वाचवायच्या असतील, तर ठेवीदारांचे संरक्षण करावे लागेल, असे मत मोदी यांनी व्यक्त केले. रिझर्व्ह बँक सहकारी बँकांवर देखरेख ठेवते, त्यावेळी सर्वसामान्य खातेदार आणि ठेवीदारांना बँकेविषयी विश्वास वाटतो, असे मोदी यांनी सांगितले.