डॉ. विजया वाड
एक होती छबू. गोरी गोरी पान फुलासारखी छान! होती ८ वर्षांची. इयत्ता ३रीत. तिचा दोस्त होता बाबू. गुब्बू गालांचा नकटा, बुटका नि हट्टी. ‘मी म्हणेन तेच’ झालं पाहिजे, असं बाबूचं म्हणणं असे. छबू नि बाबू ३रीत होते. एका बाकावर, एकमेकांशेजारी, अशी घट्ट मैत्री होती ना! की बस्स. एकमेकांशिवाय जर्रा करमायचे नाही त्या दोघांना. छबूची गणितं बाबू पटापटा सोडवी, नि बाबूचा निबंध, लांब-लांब उत्तरं छबू करून टाकी. छबू नि बाबूचा अभ्यास एकत्र चाले.
सख्ख्या मित्रांची पण कट्टी होतेच ना कधी! छबू नि बाबूची पण झाली. छबूच्या प्रिय बाबांनी दिलेली फुटपट्टी, बाबूच्या हातून तुटली. छबूला वाढदिवशी बाबांनी दिलेली भेट!
“अशी कशी तोडलीस? वेडा बाबू!”
“तोडली नाही. तुटली” बाबू म्हणाला,
“खोट्टं” “मी खोट्टारडा नाही.”
“हो. आहेसच खोटारडा.”
“मग तू पण खोट्टारडी.”
“जा कट्टी.” छबू रागाने म्हणाली. “कट्टी तर कट्टी.”
अशी घट्ट मित्रांची पक्की कट्टी झाली.
दुसरा दिवस उजाडला.
कट्टीचा बरे का! कट्टीचा दुसरा दिवस. बाबूला करमले नाही.
त्याने आईला सांगितले. छबूशी कट्टी झाली ही गोष्ट.
आई गोड हसली. “अरे सॉरी म्हण नि बट्टी कर.”
“इतकं सोप्पं असतं? बट्टी करणं!”
“मग काय! दोन बोटं बट्टीची पुढे करायची नि करंगळी वर काट मारायची तीही बोटांनी बरं का! बाबू.”
“बरं आई.”
बाबू शाळेत गेला. त्याने लग्गेच प्रयोग केला पण. २ बोटं बट्टीची, १ बोट कट्टीचं. कट्टीवर काट, बट्टीला हो!
छबूला खूप आनंद झाला.
पण एक चूक झाली. छबू चिडवत म्हणाली,
“आता कसा नाक धरून बोलायला आला.”
बाबू रागावला. “मी नाक धरून नाही.”
“पण मराठीत असंच म्हणतात.”
“नाक धरणं म्हंजे काय?”
“नाक धरणं म्हंजे शरण येणं!”
“पण मी शरण आलोच नाही.”
“बट्टी आपणहून म्हंजे शरणच.” छबू टाळ्या वाजवीत म्हणाली.
“शरण नाही,” बाबू ओरडला.
“शरण… शरण… शरण…” आख्खा वर्ग छबूच्या बाजूने बोलला.
४७ मुलं बोलली, मग बाबूला रडू आलं.
“रड्या… रड्या… रड्या…” वर्गाने चिडविले. एकसाथ ४७!!
“बाबू रड्या… बाबू रड्या…” वर्गात गोंधळ माजला.
हेडगुरुजी राऊंडवर होते. तिसरी ‘अ’त दंगा? हेड सर रागावले.
“कोणी केला आवाज? आरडाओरडा?”
वर्ग चुप्. आख्खा! चिडीचूप!
“कोणीच नाही? अरे मग शाळा डोक्यावर घेतल्यागत ओरडा कुणी केला?”
हेडगुरुजी मिशा परजीत परत ओरडले.
पण वर्ग चिडीचूप तो टाचणी शांतता चूप!
मग हेडगुरुजी रागावले नि निघून गेले.
“होss होss” हो हल्ला छोट्या दोस्तांचा!
छबू मात्र बाबूसाठी खूश नव्हती. बाबू तिचा प्रिय दोस्त होता.
प्रिय दोस्ताला कोणी चिडविले, तर आपण रागावतो ना दोस्तांनो? तसंच छबूचं झालं होतं.
इतक्यात कोणी तरी वाईट खोडी केली. बाबूच्या दप्तरात छबूची कंपासपेटी ठेवली. चटकन् पटकन्. पटकन् चटकन्. चटपट पटपट. पटापट चटापट. छबू रडायला लागली. कारण पुढला तास गणिताचा होता आणि कंपासपेटीची गरज होती. बाईंनी वर्तुळ काढायला शिकविले होते ना! गोल गोल कंपास फिरवायची. कर्कटक सेंटरमध्ये ठेवून. केवढं स्किल ना! स्किल म्हणजे? कौशल्य! तसे हुशारच आहेत आमचे बालदोस्त. मला ठाऊक आहे मुळी!
“बाई, माझी कंपासपेटी? हरवली!” छबूनं गळा काढला.
“अशी कशी हरवली?” बाईंनी विचारलं.
“मला नाही ठाऊक,” छबू आणखी जोरात रडत म्हणाली.
“बाई, बाबूचं दप्तर तपासा!” एक मुलगा म्हणाला.
बाबूच्या दप्तरात कंपास सापडली.
बाबूला रडू फुटले. तो रडत म्हणाला, “मी नाही चोरी केली.”
छबू पण रडत रडत म्हणाली, “बाबू जरी नि मी कट्टी असलो तरी बाबू चोरी करणार नाही. मारुतीची शप्पत!”
बाबूला ते फार आवडले. मनाला भावले मैत्रिणीचे शब्द!
सच्ची मैत्री अशीच असते ना दोस्तांनो?
शाळा सुटली, पाटी फुटली. सर्व धावत सुटली.
घरी जाऊन आईच्या पाठी लागता ना तुम्ही दोस्तांनो?
“आई भूक-आई भूक!” करून? तस्संच…
अगदी तस्संच… सर्व मुलं घराकडे धावत सुटली.
पण झाले काय? ठेच लागून छबू पडली.
छबू रडायला लागली. बाबूने ते बघितले. मग तो परत फिरला न बोलता तिला बर्वे सरांकडे घेऊन गेला.
“बर्वेसर…” … “माझ्या छबूला लागले.”
“अरे पण तुझी कट्टी आहे ना बाबू-छबू?”
“कट्टी दोस्तीत असते. कुणी पडले लागले, तर बट्टीच बट्टी.”
बर्वे सरांनी प्रथमोपचार पेटीतून चिकटपट्टी लावली.
“शाब्बास बाबू, उद्या तुझी गोष्ट मी प्रार्थना सभेत सांगणार.
मग दुसऱ्या दिवशी बाबूची गोष्ट साऱ्या शाळेला कळली.
“दोस्ती अशी असावी.” आख्ख्या शाळेने टाळ्या वाजवल्या.
कट्टीची बट्टी झाली.
बट्टी आणखी आणखीच घट्ट झाली. छबू नि बाबू आनंदी झाली.
आनंदाने छबूने बाबूचे हात हाती घेतले.
“बाबू आता कधीच नाही घेणार कट्टी…
तुझी नि माझी दोस्ती पक्की, बट्टी बट्टी बट्टी!”
छबू नि बाबू परत प्रिय दोस्त झाले.
छबू नि बाबू परत एकमेकांना गळा भेटले. मज्जा ना दोस्तांनो.