
कणकवली (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे सरकार आहे आणि पुढील २५ वर्षे भाजपचेच सरकार असेल, असा ठाम विश्वास केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने सक्षमपणे वाटचाल करत आहे, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी पडवे मेडिकल कॉलेज येथे पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते. यावेळी त्यांनी कोरोनासह विविध मुद्द्यांवर केंद्र सरकार चांगले काम करत आहे. ओमायक्रॉन या नव्या कोरोनाच्या विषाणूसंदर्भातही विविध प्रभावी उपाययोजना केंद्राकडून केल्या जात आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालील देशाची योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे. देश आत्मनिर्भरतेच्या दिशेने चालला असून अधिवेशन सुरळीत सुरू आहे, शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले.
आपल्या खात्याचा विस्तार वाढावा, अधिकाधिक रोजगार निर्मिती खात्याच्या माध्यमातून व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले. जानेवारीत महिन्यात २१, २२, २३ रोजी माझे केंद्रीय उद्योग मंत्रालयाचे सेक्रेटरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना येणार आहेत. केरळच्या धर्तीवर सगळ्या योजना कोकणात आणणार आहे. कोकणातील उत्पादने आणि त्यावरचे प्रक्रिया उद्योग या बद्दलची माहिती दिली जाईल. त्या संदर्भातील प्रात्यक्षिकही दिले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ परिसरात युनिट सुरू केले जाणार आहे. जास्तीत जास्त उद्योग सुरू करून देशात आर्थिक उन्नती आणण्याचा आणि माझ्या खात्याच्या माध्यमातून देशाचा जीडीपी वाढविण्याचा प्रयत्न आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत, अशी माहिती उद्योगमंत्री राणे यांनी दिली.
दरम्यान, सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत बोलताना राणे म्हणाले, मला प्रश्न समजला होता, अध्यक्षांना वाटले तो प्रश्न समजला नसेल, म्हणून अध्यक्षांनी तो पुन्हा सांगितला. मी पूर्ण तयारीने गेलो होतो. कोणतेही कागदपत्रे हातात न घेता उद्योगांसंदर्भात माहिती दिली. भारत आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचे काम सुरू आहे. अधिवेशनामध्ये कायदे करणारी बिले पास होत आहेत. सर्व काही व्यवस्थित सुरू आहे, असेही यावेळी नारायण राणे यांनी सांगितले.
मुंबई मनपामध्ये सत्ता बदल होण्याच्या दृष्टीने राणे यांनी तीन पक्षांना निवडणूक नको. आजचे मरण उद्यावर ढकलण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर मुंबई मनपामध्ये दिसेल असे काम करू. मला ५५ वर्षे राजकारणात झाली, त्यामुळे मुंबई मनपामध्ये सत्ताबदल होईल, मात्र पत्रकारांना मनपा संदर्भात प्लॅन सांगून सुरुंग लावायचा नाही, त्यामुळे सांगणार नाही असेही राणे यावेळी म्हणाले.
यावेळी नारायण राणे यांनी बोलताना, सतीश सावंत कोण आहेत, संचयनीत घोटाळा केला तेच ना? असे म्हणत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना टोला लगावला. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत १०० टक्के निकाल आमच्या बाजूने लागेल, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
संजय राऊत नक्की कोणत्या पक्षात?
नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीत ते राष्ट्रवादीच्याच कार्यालयात असतात. त्यांना शिवसेनेविषयी कोणतीही निष्ठा नाही, प्रामाणिक नाहीत. ते कधी होते शिवसेनेत, काय केले पक्षासाठी? संजय राऊत जसे दाखवतात तसे नाहीत. लावालावीचे काम करतात. त्यामुळेच त्यांचे नाव संजय राऊत आहे. एका खासदाराला, वृत्तपत्राच्या संपादकाला अशा प्रकारची भाषा शोभत नाही, असा हल्लाबोल यावेळी नारायण राणे यांनी केला.