Tuesday, July 1, 2025

आशासेविकांच्या मनाधन वाढीसाठी प्रयत्न करणार

आशासेविकांच्या मनाधन वाढीसाठी प्रयत्न करणार

कणकवली : कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घर सोडले नाही. मोठ्यात मोठे मंत्री सुद्धा घराबाहेर पडले नाहीत; मात्र गावागावात आणि घराघरात आशाताई सेविका पोहोचल्या. जनतेला सेवा दिली. तुम्ही आमच्यासाठी जेवढे करता त्याची परतफेड करता येणार नाही, मात्र अधिवेशनात तुमचे प्रश्न मांडून शासनाकडून तुमच्या मानधनात भरीव वाढ करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मी तुमचा आमदार म्हणून सातत्याने या सरकारला तुमचे हक्क देण्यास भाग पाडेन, अशी ग्वाही भाजप आमदार नितेश राणे यांनी दिले.



आशा सेविका दिनानिमित्त शुक्रवारी कणकवली तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात आ. नितेश राणे बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, गतविकास अधिकारी हजारे, आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, मिलिंद मेस्त्री, डॉ. वळंजू, डॉ. टिकले, जिल्हा गट प्रवर्तक चिंदरकर आदी उपस्थित होते.
खऱ्या अर्थाने सेवा करणारी कोण असेल तर अशा सेविका आहे. मात्र सरकार त्यांना त्यांच्या सेवेचा मोबदला देत नाही. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आशाताईंना मार्गदर्शन केले, तेव्हा डायबेटीस होईल, असे वाटले. एवढे ते गोड बोलले होते. मात्र पुढे काय? काहीच झाले नाही. ना मानधन वाढले, ना मोबदला मिळाला.तरीही तुम्ही थांबला नाहीत. काम करत राहिलात. त्यामुळेच येत्या अधिवेशनात मी तुमच्यासाठी आवाज उठविणार असल्याचे नितेश राणे म्हणाले.



कोरोना काळात खऱ्या योद्धा आशाताई सेविका आहेत. शासकीय मदत जेव्हा कोणीच देत नव्हते, तेव्हा आमदार नितेश राणे यांनी आशासेविकांना मदत दिली आणि आशाताईंना प्रोत्साहन दिले. यापुढे सुद्धा असेच काम करत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी कायम असू, असा विश्वास यावेळी जि.प. अध्यक्ष सावंत यांनी उपस्थित आशासेविकांना दिला. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या आशाताईंचा सत्कार करण्यात आला

Comments
Add Comment