नवी दिल्ली : देशाचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्या निधनामुळे देशभक्त दु:खी आहेत. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. आज मी ८ डिसेंबर रोजी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत हुतात्मा झालेल्या सर्व वीरांना श्रद्धांजली अर्पण करतो. बिपीन रावत यांचे जाणे देशप्रेमी, प्रत्येक देशभक्तासाठी मोठी हानी आहे. ते खूप शूर होते. संपूर्ण देश त्यांच्या परिश्रमांचा साक्षीदार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
बिपिन रावत यांच्या निधनाबाबत पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच जाहीर सभेमधून भाष्य केले आहे. मोदी म्हणाले की, आज भारत देश दु:खी आहे. मात्र वेदना सहन करताना आपण गती वा प्रगती रोखत नाही. आता भारत थांबणार नाही. आम्ही भारतीय खूप मेहनत करू. देशाच्या आतील आणि बाहेरील प्रत्येक आव्हानांचा सामना करू. भारताला अजून शक्तिशाली करू.
देशाच्या सीमांचे रक्षण वाढवण्याचे काम बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चरला भक्कम करण्याचे काम आणि देशाच्या सैन्यदलांना आत्मनिर्भर बनवण्याचे अभियान. तसेच तिन्ही सैन्यदलांमध्ये चांगला ताळमेळ राखण्याचे काम, अशी अनेक कामे ही वेगाने पूर्ण केली जातील. यावेळी मृत्यूशी झुंजत असलेल्या वरुण यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठीही मोदींनी प्रार्थना केली.
उत्तर प्रदेशमधील देवरिया येथील राहणारे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर जीवतोड मेहनत घेत आहेत. मी आई पाटेश्वरीकडे त्यांच्या जीविताच्या रक्षणासाठी प्रार्थना करतो. तसेच या अपघातात आम्ही ज्या वीरांना गमावले. त्यांच्यासोबत आमच्या संवेदना आहेत, असेही मोदी म्हणाले.