Tuesday, July 1, 2025

आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपर फूटी प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई

आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपर फूटी प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई
पुणे : आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षेत झालेले गोंधळ, त्यानंतर प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता आरोग्य विभागाची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) करावी, अशी मागणी होत असली, तरी ते अशक्य असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. एमपीएससीमार्फत पदभरती केल्यास त्या प्रक्रियेला विलंब लागेल, असा दावाही पवार यांनी केला. आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फूटी प्रकरणात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर करोना आढावा बैठकीसाठी पुण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री पवार यांनी त्याबाबत माहिती दिली.

शासनाने निर्णय घेतल्यानंतर प्रत्येकाने पारदर्शकपणे काम केले पाहिजे. मात्र, परीक्षेतील गैरप्रकार समोर आल्याने दुर्दैवाने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना आरोग्य विभागाच्या गट-क आणि गट-ड संवर्गाची परीक्षा दोन वेळा पुढे ढकलावी लागली. परीक्षा घेण्याबाबत व्यवस्थेचे संगणकीकरण होऊनही असे प्रकार घडणे दुर्दैवी आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपर फूट प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करू. एवढी कडक कारवाई करू, की यापुढील काळात असे प्रकार होणार नाहीत, अशी ग्वाही पवार यांनी या वेळी दिली.

आरोग्य विभागाच्या परीक्षा एमपीएससीमार्फत घेणे अवघड आहे. कारण असा निर्णय घेतल्यास परीक्षा घेण्यास विलंब लागेल. एमपीएससीकडे हजारो विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे आणि उमेदवारांची निवड करणे प्रलंबित आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >