मुंबई : राज्यातील ओमायक्रॉनच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर ११ आणि १२ डिसेंबर रोजी मुंबईत जमावबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली आहे. त्यामुळे व्यक्ती किंवा वाहनांच्या रॅली, मोर्चे, मिरवणुका इत्यादींना मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी मुंबईमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपासून कडक नियम लागू करण्यात आले आहेत.
मालेगाव, अमरावती हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडक पाऊल उचलली आहे. मुंबईत शुक्रवारी रात्रीपासून १२ डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मोर्चा, रॅली किंवा कोणत्याही आंदोलनाला परवानगी नसणार आहे. याबद्दल मुंबई पोलिसांनी नवे आदेश जारी केले आहे. विशेष म्हणजे या आदेशात अमरावती, नांदेडमध्ये झालेल्या हिसाचाराचाही संदर्भ देण्यात आला आहे. त्याचबरोबर कोव्हिडचा नवा व्हेरिएन्ट ओमायक्रॉन पसरत असल्याने काळजी म्हणून रॅली, आंदोलन आणि सभांना परवानगी नसल्याचं मुंबई पोलिसांकडून आदेशात म्हटले आहे.
दरम्यान मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे आणि वक्फ मालमत्तेचे संरक्षण व्हावे, या मागणींसाठी मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतला आहे. मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम मुंबईपर्यंत तिरंगा रॅली काढणार आहे. तिरंगे झेंडे हातात घेऊन एमआयएम कार्यकर्त्यांची वाहने राज्यभरातून मुंबईकडे निघाली आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी उपरोक्त आदेश जारी केले आहेत.